जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
विश्वास मुकेश भिल्ल (वय ३३, रा. शिरसोली)याने २९ सप्टेंबर २०१४ रोजी गावातील एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोषारोप सादर केल्यानंतर न्यायाधीश एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
सरकार पक्षाने एकूण आठ साक्षीदार तपासले. यात पीडित मुलीसह प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने विश्वासला दोषी धरून शिक्षा ठोठावली. त्याला तीन वर्षांचा कारवास आणि पाच हजार रूपयांचा दंड ही शिक्षा ठोठावण्यात आली. यातल्या दंडातील चार हजार रूपयांची रक्कम ही पिडीत तरूणीला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे ऍड. वैशाली महाजन यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी यांनी सहकार्य केले.