जळगाव (प्रतिनिधी) मागील काही दिवसापासून उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने माणसांप्रमाणेच जनावरांच्या अंगाची लाही-लाही होत आहे. उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्याने मुकी जनावरे त्रस्त झाली आहेत. उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळावा यासाठी गुरे पाण्याचा आसरा घेताना दिसताय. शहरातील लेंडी नाला तर जणू म्हशींसाठी ‘स्विमिंग पूल’ बनल्याचेच चित्र आज दुपारून बघावयास मिळाले.
मुके प्राणी पाण्यात राहून आपले शरीर थंड करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र सध्या शहर व ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. नदी-नाल्यात गाई-म्हशी ठाण मांडत आहेत. अंगाची झालेली लाही लाही कमी करण्यासाठी ही जनावरे पाण्याच्या डबक्याचा आधार घेत आहेत. उन्हाचा पारा अधिकच वाढल्याने मुक्या प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यामुळे मुक्या प्राण्यांनी आपला मोर्चा गारवा मिळविण्यासाठी पाण्याच्या ठिकाणी वळवला असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे. जळगाव शहरात 5 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पाणी उरत नाहीय. तर शेत-शिवारातील जलस्त्रोत आटले आहेत. सध्या जनावारांना पाण्यासाठी सध्या विहिरीचाच अधार आहे, मात्र भूगर्भातील पाणीपातळी घटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. या जनावरांना पाणी पाजण्यासाठी जनावरांच्या मालकांना पायपीट करावी लागत आहे. अशा परिस्थितीत जनावरांच्या मालकांकडून शहरातील लेंडी नाल्याचा सहारा घेतला जात आहे.