जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचा झेंडा : जाणून घ्या निकाल आणि लढतींची अचूक माहिती

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीच्या दिवशी भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तसेच अन्य काही उमेदवारांनीही आपापले अर्ज मागे घेतले. यामुळे जिल्हा बँकेतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यात महाविकास आघाडीने आधीच ११ जागा बिनविरोध जिंकल्याने बँकेवर आघाडीचा झेंडा फडकला आहे. जाणून घ्या कोण बिनविरोध निवडून आले अन् कोण रिंगणात उरलेत ते ?

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती. यात भारतीय जनता पक्षाने अतिशय आश्‍चर्यकारक भूमिका घेत अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, अर्ज माघारीची मुदत उलटून गेल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी बँकेतील लढतीबाबतची माहिती जाहीर केली.

यानुसार सोसायटी मतदारसंघांचा विचार केला असता मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बिनविरोध निवडून आले आहेत. चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातून प्रदीप रामराव देशमुख यांची बिनविरोध निवड झालेली आहे. पाचोरा सोसायटी मतदारसंघातून किशोरआप्पा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. जामनेरमधून नाना राजमल पाटील हे जिल्हा बँकेत बिनविरोध निवडून गेले आहेत. धरणगावमधून आधीच संजय पवार यांची बिनविरोधी निवड निश्‍चीत झाली होती. यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. बोदवडमधून रवींद्रभैय्या पाटील यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. बोदवडमधून प्रतापराव हरी पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. यासह अमळनेर, पारोळा आणि एरंडोलमधून आधीच अनुक्रमे आ. अनिल भाईदास पाटील, चिमणराव पाटील आणि अमोल पाटील यांची निवड निश्‍चीत झाली होती. यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले.

दरम्यान, भुसावळ सोसायटी मतदारसंघात शांताराम धनगर आणि संजय सावकारे यांच्यात लढत होणार आहे. यावलमध्ये विनोद पंडित पाटील, प्रशांत चौधरी आणि गणेश नेहेते यांच्यात सामना होणार आहे. जळगाव विविध कार्यकारी सोसायटी गटातून महापौर जयश्री सुनील महाजन यांचा बिनविरोध विजय झाला आहे. रावेरमध्येही तिरंगी लढत होणार असून यात माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील, जनाबाई गोंडू महाजन आणि राजीव रघुनाथ पाटील यांच्यात सामना होणार आहे. चोपडा विकासोमध्ये घनश्याम अग्रवाल, डॉ. सुरेश शामराव पाटील आणि संगीताबाई प्रदीप पाटील यांच्यात लढत होणार आहे.

महिला राखीव मतदारसंघातून विद्यमान अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्यासह कल्पना शांताराम पाटील, पाटील अरूणा दिलीपराव, शैलजादेवी दिलीपराव निकम, शोभा प्रफुल्ल पाटील आणि सुलोचना भगवान पाटील यांच्यामध्ये लढती होणार आहेत.

अनुसूचित जाती मतदारसंघात शामकांत बळीराम सोनवणे, प्रकाश यशवंत सरदार आणि नामदेव भगवान बाविस्कर यांच्यात सामना रंगणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातून मेहताबसिंग रामसिंग नाईक आणि विकास ज्ञानेश्‍वर वाघ यांच्यात मुकाबला रंगणार आहे. इतर संस्था आणि व्यक्तीगत सभासद या वर्गवारीतून गुलाबराव बाबूराव देवकर, प्रकाश जगन्नाथ पाटील, प्रकाश यशवंत सरदार, उमाकांत रामराव पाटील आणि रवींद्र सूर्यभान पाटील यांच्यात सामना होणार आहे.

यासोबत इतर मागास प्रवर्गातील मतदारसंघात विकास मुरलीधर पवार, डॉ. सतीश भास्करराव पाटील, प्रकाश जगन्नाथ पाटील आणि राजीव रघुनाथ पाटील यांच्यात सामना होईल. दरम्यान, याप्रमाणे लढती निश्‍चित झाल्या असून उद्या सकाळी अकरा वाजता उमेदवारांना निशाण वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपनिबंधक संतोष बिडवई यांनी याप्रसंगी दिली.

Protected Content