जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसने दहा जागांची केलेली मागणी आणि शिवसेनेने अद्यापही आपली भूमिका जाहीर केली नसल्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल होणार की नाही ? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून याबाबत आज होणार्या कोअर समितीच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चीत झाला असून याबाबत सोमवारी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी २१ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमाच्या संभाव्य वेळापत्रकानुसार ११ ऑक्टोबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची सुरुवात होऊ शकते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बँकेतील सभागृहात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. वाहने आणि विश्रामगृह सहकार विभागाकडून अधिग्रहीत करण्यात आले आहे. बँकेच्या सभागृहातील कार्यालयात निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
दरम्यान, एकीकडे निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असतांना दुसरीकडे सर्वपक्षीय पॅनलसाठीच्या घडामोडी वेगवान झाल्या आहेत. यासाठी काल गुलाबराव देवकर वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, संचालक संजय पवार, माजी आमदार संतोष चौधरी, दिलीप वाघ आदींची उपस्थिती होती. यात कोणत्याही स्थितीत दहापेक्षा कमी जागा घ्याव्यात असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राष्ट्रवादी दहा जागांवर ठाम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यातच आज बँकेच्या पॅनलसाठी तयार केलेल्या कोअर कमिटीची बैठक होणार असून त्यात जागा वाटपाचा निर्णय होईल. ही बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत होणार असून यातच सर्वपक्षीय पॅनलचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे आता या पॅनलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.