जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अलीकडेच एका बालकाचा मृत्यू झाला असतांनाच पुन्हा एकदा खोटेनगर जवळ ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, पंकज शालीग्राम शर्मा हे विद्यापीठातील मेस चालवणारे व्यावसायिक प्रेम नगरात राहत होते. काल रात्री आठच्या सुमारास ते विद्यापीठातून आपल्या घरी दुचाकीवरून घरी निघाले होते. यातच भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, हा अपघात झाल्यावर येथूनच जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित हे तेथून जात होते. त्यांनी तात्काळ पंकज शर्मा यांना रूग्णालयात दाखल केले. तथापि, याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. यामुळे कालींका माता चौकातील दुर्घटनेच्या नंतर उपाययोजना न करण्यात आल्यामुळे हायवेने पुन्हा एक बळी घेतला आहे.