जळगावात विवाहितेचा ‘हाय व्‍होल्टेज’ ड्रामा; झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । पती-पत्नीत झालेल्या कौटुंबिक वादातून पती मुलीचा ताबा देत नाही, पोलीसांकडे मागणीकरूनही कोणतीही दखल घेतली जात नाही म्हणून आश्विनी पंकज पाटील रा. विरवाडे ता. चोपडा ह.मु. गाढोदा ता.जळगाव या विवाहितने आज दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर झाडावरून चढून ‘हाय व्‍होल्टेज’ ड्रामा करत आंदोलन केले. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी महिलेला न्याय मिळवून देवू असे आश्वासन दिल्यानंतर काही तरूणांच्या मदतीने विवाहितेला खाली उतरविण्यात आले.

अशी आहे हकीकत
याबाबत माहिती अशी की, अश्वीनी व पंकज अशोक पाटील रा. विरवाडे ता.चोपडा यांचा २०१७ मध्ये विवाह झाला. पती पंकज पाटील हे पुण्यात युरीका फोर्स मध्ये नोकरीला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पंकज व त्यांच्या कुटुंबियांनी दोन लाख रूपये आणावे यासाठी छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर वारंवार पैश्यांची मागणी सुरूच होती. दरम्यान, पिडीत विवाहितेला मुलगी झाली. त्यानंतर विवाहितेचे वडील पुण्याला गेले असता सासरच्या मंडळींनी त्यांच्याशी वाद घातला. २ फेब्रुवारी २०२० रोजी दीड वर्षाच्या मुलीला हिसकावून आश्विनीला घराबाहेर काढले, तेव्हापासून पिडीता शेजारचाच्या मदतीने आईवडीलांकडे राहत आहे. दरम्यान याप्रकरणी पती पंकज अशोक पाटील, सासू रेखा अशोक पाटील, सासरे अशोक विश्राम पाटील व जेठ प्रदीप अशोक पाटील यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

पोलीसांकडून टाळाटाळ
गुन्हा दाखल झाल्यानंतर पती व सासरचे मंडळी कोर्टातून तीन वेळा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र न्यायालयीन तारखेस हजर राहत नव्हते. दरम्यान, इकडे मुलीचा ताबा मिळावा यासाठी पिडीता वारंवार पोलीसांकडे चकरा मारत होत्या. पोलीसांकडून कोणतीही मदत मिळत नव्हती. आज जिल्हा न्यायालयात कोर्टाची तारीख असल्याने सासरची मंडळी येतील व मला मुलीचा ताबा मिळेल अश्या आशेवर न्यायालयात आल्या. मात्र घटस्फोटाच्या कागदावर स्वाक्षऱ्या कर मगच मुलीचा ताबा देवू असे सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर केले आंदोलन
आपल्याला न्याय मिळत नसल्याने विवाहितेने थेट जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले. अधिक्षक कार्यालयात त्यांची कोणत्याही अधिकाऱ्याने दखल न घेतल्याने विवाहितेने सरळ पोलीस अधिक्षक कार्यालयाबाहेर असलेल्या झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. सदरील प्रकार पोलीसांच्या लक्षात येताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत झाडावरून उतरणार नाही असा पवित्रा घेतला. जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी विवाहितेची समजूत घालून झाडावरून खाली उतरविले.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात महिलेला जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी विवाहितेच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून मुलीसह जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/330985224731739/

Protected Content