जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमिवर जळगावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर उद्या दिनांक 3 फेब्रुवारीपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. येथे अनेक लहान मोठे अपघात होत असून यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमिवर महामार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. सोमवारपासून दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेल्यांसाठी हेल्मेट अनिवार्य असणार आहे. ज्यांच्याकडे हेल्मेट नसेल त्या दुचाकीस्वारांना प्रत्येकी एक हजार रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, उद्यापासून वाहतूक पोलिसांची पथके राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वारांची तपासणी करणार आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक एम. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे निरिक्षक राहूल गायकवाड आणि त्यांचे सहकारी उद्यापासून महामार्गावर उतरणार आहेत.