जळगाव प्रतिनिधी | महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ बांधलेले गांधीधाम हे जणू भारतातील पाचवे धाम अाहे. त्यात समग्र गांधी दर्शन हाेते. लहान मुलांसह तरुण पिढी येथे येऊन गांधी काय हे जाणून घेऊन जीवनासाठी प्रेरणा घेऊ शकतात. गांधीजींच्या सत्य, अहिंसा, स्वदेशी, सदाचार आदींचे शिक्षण घेऊन देश चालवणारे देशाला नवी दिशा देऊ शकतात. भवरलाल जैन यांची कल्पनाशक्ती वाखाणण्याजोगी आहे. बापूंच्या चरणी विनम्र अभिवादन, अशी लिखीत प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नोंदवली.
राज्यपालांनी जैन हिल्सस्थित गांधीतीर्थला भेट दिली. गांधीतीर्थ येथे जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी त्यांचे स्वागत केले. अतुल जैन सोबत उपस्थित होते. गांधीतीर्थ या ऑडिओ गाइडेड म्युझियम ‘खोज गांधीजी की’ या संग्रहालयास राज्यपालांनी सुमारे तासभर भेट दिली. तसेच माहिती जाणून घेतली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त अशोक जैन, डॉ. सुदर्शन आयंगार यांनी राज्यपालांचे सुतीहार देऊन स्वागत केले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे मुख्य समन्वयक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, नितीन चोपडा उपस्थित होते.