जळगाव, प्रतिनिधी | शहरातील कचरा संकलनाचे कंत्राट घेणाऱ्या ‘वॉटर ग्रेस’ कंपनीच्या कामगारांनी त्यांना चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने आज (दि.२६) सकाळपासूनच काम बंद आंदोलन पुकारले होते. त्या दरम्यान कंपनीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत वाद होऊन एका कामगाराला त्यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.
अधिक माहिती अशी की, या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाली होती. याबाबत वारंवार कंपनीकडे मागणी करूनही पगार मिळत नसल्याने हवालदील झालेल्या कामगारांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन केले. या दरम्यान दुपारच्या सुमारास कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधींनी आंदोलन करणाऱ्या कामगारांना जाब विचारला असता त्यांनी पगाराची मागणी केली. तेव्हा बोलाचालीत वाद होऊन त्यात प्रतिनिधींनी एका कामगाराला नेतागिरी करतो म्हणून मारहाण केली. त्यानंतर काही कामगारांना बँकेत खाते उघडल्याचे पासबुक कंपनीकडून देण्यात आले आणि त्यात केवळ एक महिन्याचा पगार जमा करण्यात आला आहे.
जळगाव शहरात कचरा गोळा करणारी सुमारे ८५ वाहने असून प्रत्येक वाहनावर दोन कामगार आहेत. म्हणजे १७० लोकांच्या रोजगाराचा हा प्रश्न बिकट झाला आहे. या कामगारांच्या दोन प्रतिनिधींनी आज दुपारी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलून आपल्या व्यथा मांडल्या. त्यांनी आपणास न्याय मिळावा अशी मागणीही यावेळी केली. या कामगारांच्या समस्येकडे ‘वॉटर ग्रेस’ कंपनी आणि मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष घालून त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2860606133951876/