जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या संभाव्य कार्यवाहीवर तोडगा काढण्यासाठी थकबाकीदार गाळेधारकांनी आमदार राजूमामा भोळे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला.
याबाबत वृत्त असे की, पालिकेकडून टप्प्याटप्प्याने दुकानांना टाळे ठोकले जात आहे. महात्मा फुले व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनंतर आता जुने बी.जे. मार्केटमधील गाळेधारकांना पालिकेने नोटिसी बजावल्या आहेत. या पार्श्वभूमिवर, गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात कोअर कमिटी सदस्य व बीजे मार्केटमधील गाळेधारकांनी आमदार सुरेश राजूमामा भोळे यांच्या घरासमोर ठिय्या मांडला. थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाइ होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणी आमदारांनी तोडगा काढण्याचे साकडे याप्रसंगी त्यांना घालण्यात आले. या प्रकरणी तोडगा न निघाल्यास चौदा मार्केटमधील गाळेधारक दुकाने बेमुदत बंद ठेवून उपोषण करतील. रस्त्यावर उतरतील, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. या संदर्भात बुधवारी कोअर कमिटी सदस्यांची बैठक होणार असून यात पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.