जळगाव जिल्ह्यास चौथ्यांदा मिळणार केंद्रीय मंत्रीपदाची संधी !

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( Exclusive Report ) | रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे या केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे आता स्पष्ट झाले असून या माध्यमातून असा सन्मान मिळवणार्‍या त्या जळगाव जिल्ह्यातील चौथ्या मान्यवर बनणार आहेत.

आजवर केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी फक्त तीन मान्यवरांना मिळालेली आहे. तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ विधीज्ज्ञ हरीभाऊ पाटसकर यांनी १९५५ ते १९५७ च्या दरम्यान आधी कायदामंत्री आणि नंतर नागरी उड्डयन मंत्री म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. यानंतर १९७७ ते ७९ च्या दरम्यान जनता पक्षाचे तत्कालीन जळगाव लोकसभा मतदारसंघाचे जनता पक्षाचे खासदार सोनूसिंग धनसिंग पाटील यांना केंद्रीय गृह राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली होती. तसेच, एम. के. अण्णा पाटील यांना २००१ ते २००४ या कालावधीत केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तब्बल २० वर्षांनी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांना मंत्रीपद मिळणार आहे.

यातील लक्षणीय बाब म्हणजे आधी मंत्री झालेले सर्व मान्यवर हे गिरणा खोर्‍यातील होते. हे तिन्ही नेते चाळीसगावचे रहिवासी होते. तर तापी खोर्‍यातून रक्षाताई खडसे याच पहिल्यांदा केंद्रीय मत्रंपदी आरूढ होणार आहेत. याआधी कै. वाय. एस. महाजन, कै. डॉ. गुणवंतराव सरोदे आणि कै. हरीभाऊ जावळे यांची मंत्रीपदाची संधी हुकली. तथापि, रक्षाताई खडसे यांना मात्र केंद्रीय मंत्रीपदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. यातच, दोन दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपद मिळणार असून या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला प्रगतीचे पंख लागावेत अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे.

टिप : तत्कालीन धुळे जिल्ह्यातून निवडून आलेले आणि नंतर जळगावातून निवडून आलेले विजय नवल पाटील यांना १९८५ साली विज्ञान, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश मंत्रालयाची धुरा मिळाली. नंतर त्यांना केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री या पदावर कार्य करण्याची संधी मिळाली. मात्र ते धुळ्याचे खासदार असतांना मंत्री झालेले होते. यानंतर ते एरंडोलचे खासदार असतांना मंत्रीपद मिळाले नाही हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

Protected Content