गुगल स्ट्रीट व्ह्यू वर जळगाव जिल्हा दाखल : बघा ३६० अंशातून आपला परिसर !

जळगाव-जितेंद्र कोतवाल ( एक्सक्लुझीव्ह फिचर ) | अल्फाबेट कंपनीच्या गुगल मॅप्सवरील ‘गुगल स्ट्रीट व्ह्यू’ ही सुविधा आता स्थानिक पातळीवर देखील सुरू झाली असून यात जळगाव जिल्ह्यातील बहुतांश परिसराचा समावेश करण्यात आलेला आहे.

गुगल मॅप्सचा आपण अतिशय विपुल प्रमाणात वापर करतो. यावर Google Street View हे एक अनोखे टुल असून याच्या माध्यमातून ३६० अंशातून भोवताल पाहण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ही चारही बाजूंनी पाहण्याची सुविधा असणारी ‘पॅनोरॅमीक फोटोग्राफी’ होय. गुगलच्या नकाशावर २५ मे २००७ साली पहिल्यांदा ‘स्ट्रीट व्ह्यू’ ही सुविधा देण्यात आली. पहिल्या टप्प्यात यावर क्रमाक्रमाने अमेरिकेतील विविध शहरांचा समावेश करण्यात आला. यानंतर कॅनडासह अन्य राष्ट्रांमध्येही स्ट्रीट व्ह्यू सेवा प्रदान करण्यात आली.

‘स्ट्रीट व्ह्यू’ या सुविधेसाठी गुगलने खास वाहनांची निर्मिती केली असून याच्या मदतीने कोणत्याही स्थळांचे ३६० अंशातून चित्रीकरण करण्यात येते. साधारणपणे एखादी कार व त्यावर लावलेली विचीत्र आकारमानाचे कॅमेरे असे या वाहनाचे स्वरूप असते. गुगल स्ट्रीट व्ह्यू कार म्हणून हे ख्यात झाले आहे. साधारणपणे २०१६ पासून गुगलने भारतातील विविध शहरांमध्ये आपल्या वाहनाच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचे ठरविले.

पहिल्यांदा बंगळुरू शहरात चित्रीकरण करण्यास प्रारंभ झाला. मात्र गोपनीयतेचे उल्लंघन होण्याच्या कारणावरून गुगलला छायाचित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला. यानंतर गुगलने २०१८ साली भारत सरकारकडे पुन्हा परवानगी मागितली असतांनाही त्यांना होकार मिळाला नाही. यानंतर मात्र गुगलने टेक महिंद्रा आणि जेनेसीस इंटरनॅशनल या दोन भारतीय कंपन्यांशी सहकार्याचा करार केला. यासोबत ‘स्ट्रीट व्ह्यू’मध्ये दिसणार्‍या लोकांचे चेहरे ब्लर करण्यास तसेच संवेदनशील ठिकाणांमध्ये छायाचित्रीकरण न करण्यास संमती दर्शविली. यातूनभारतातला ‘गुगल स्ट्रीट व्ह्यू’चा मार्ग मोकळा झाला.

२८ जुलै २०२२ रोजी Google Street View देशातील प्रमुख दहा शहरांमध्ये लॉंच करण्यात आले. यानंतर आता संपूर्ण भारतात स्ट्रीट व्ह्यू उपलब्ध झाले आहे. यात जळगाव जिल्ह्याचा देखील समावेश आहे. आपल्या जिल्ह्याचा विचार केला असता भुसावळ परिसरातील काही संवेदनशील ( उदा. आयुध निर्माण, मिलीट्री कँप आदी ) भागांना वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व तालुक्यांमधील कोणतेही ठिकाण आता आपण ‘स्ट्रीट व्ह्यू’च्या माध्यमातून पाहू शकणार आहोत.

‘स्ट्रीट व्ह्यू’ वर असे शोधा ठिकाण

Google Street View वर कोणतेही ठिकाण शोधण्याआधी आपल्याला मॅप्स या फिचरमध्ये थोडी सेटींग चेंज करावी लागणार आहे.

आपण जर गुगल मॅप्स मोबाईलवरून (अँड्रॉईड अथवा आयओएस ) वापरत असाल तर पहिल्यांचा ऍप ओपन करा.

यानंतर वरील बाजूला असलेल्या ‘लेअर’ या पर्यायावर क्लिक करा.

येथे खालील बाजूस आपल्याला ‘स्ट्रीट व्ह्यू’ हा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर आपण मॅप्सवर आपल्याला हव्या असणार्‍या ठिकाणाच्या ३६० अंशातील प्रतिमा पाहू शकतो.

आपण जर संगणकावरून गुगल मॅप्स https://www.google.co.in वापरत असाल तर आपल्याला उजव्या बाजूला खाली एक मानवी आकाराची बाहुली दिसेल. तिला कर्सरच्या मदतीने मॅप्सवर घेऊन गेले असता गुगल स्ट्रीट व्ह्यूमध्ये आपल्याला प्रिव्ह्यू दिसेल. यानंतर हवे ते ठिकाण आपण ३६० अंशात पाहू शकतो.

Google Street View बघतांना ही बाब लक्षात घ्यावी !

गुगलने गोपनीयतेचे संरक्षण व्हावे यासाठी रस्ते अथवा सार्वजनीक वा खासगी ठिकाणांना दर्शवितांना लोकांचे चेहरे ब्लर केले आहेत.

स्ट्रीट व्ह्यूच्या माध्यमातून रस्ते, भौगोलिक/ऐतीहासीक स्थळे; खासगी आस्थापने ( उदा. हॉटेल्स, कॅफे आदी ) यांना आपण ३६० अंशात पाहू शकतो. यात काही युजर्सनी स्वत: अपलोड केलेल्या पॅनोरॅमीक व्हर्च्युअल टुर्सचाही समावेश आहे.

खाली पहा जळगावातील निवडक चौकांचा स्ट्रीट व्ह्यू !

आकाशवाणी चौक

शास्त्री टॉवर चौक

अजिंठा चौफुली

जिल्हाधिकारी कार्यालय

Protected Content