जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर थकीत कर्जाचा मोठा प्रश्न उभा ठाकला असून हजारो शेतकरी सभासदांकडून कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार बँकेची एकूण थकबाकी सुमारे ५१२.१२ कोटी रुपयांवर पोहोचली असून शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील आकडेवारीनुसार बँकेचे एकूण सभासद सुमारे ९४ हजारांहून अधिक आहेत. यापैकी ८१ हजार ३९४ सभासद हे दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेले शेतकरी आहेत. या गटातील थकबाकी रक्कम सुमारे २७३.२७ कोटी रुपये असून त्यावरील व्याज सुमारे १३७.०१ कोटी रुपये आहे. त्यामुळे या गटातील शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ४१०.२८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत या सर्व पात्र शेतकऱ्यांचा डेटा शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.

दुसरीकडे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकरी सभासदांची संख्या १० हजार ८६१ इतकी आहे. या गटातील थकबाकी रक्कम सुमारे २२६.५८ कोटी रुपये असून त्यावरील व्याज ३२८.१० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची एकूण थकबाकी ५५५.०७ कोटी रुपये इतकी झाली आहे. शासनाने या गटातील शेतकऱ्यांनाही प्रत्येकी दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिल्यास मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो.
उपलब्ध माहितीनुसार दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १० हजार ८६१ शेतकरी सभासदांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिल्यास सुमारे २१७.२२ कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो. त्यानंतर उर्वरित सुमारे ३३७.८५ कोटी रुपये शेतकऱ्यांना स्वतः भरावे लागतील. शेतकऱ्यांनी ही रक्कम भरल्यास बँकेची मोठ्या प्रमाणावर थकबाकी वसूल होण्याची शक्यता आहे.
याशिवाय दोन लाख रुपयांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी सुमारे ४१०.२८ कोटी रुपये आहे. या दोन्ही गटांना मिळून शासनाकडून एकूण सुमारे ६२७.५० कोटी रुपये कर्जमाफीच्या स्वरूपात बँकेला मिळू शकतात. जर शासनाकडून मदत मिळाली आणि शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याची रक्कम भरली तर बँकेची एकूण सुमारे ९६५.३५ कोटी रुपयांची थकीत कर्ज व व्याजाची वसुली होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिल २०२५ मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जर ३१ मार्च २०२६ पर्यंत कर्ज भरल्यास त्यांना ५० हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे, याबाबत जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.



