जळगाव प्रतिनिधी | प्रभाग समिती सभापती निवडणुकीत व्हीप नाकारल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी अपील दाखल करण्यात आले असून यासाठी संबंधीतांना ११ जानेवारी रोजी उपस्थित राहण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
जळगाव महापालिकेत भाजपमध्ये फुट पडून मार्च महिन्यात सत्तांतर झाले होते. यात शिवसेनेच्या जयश्री महाजन यांना ४५ मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना २८ मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी विजय संपादन केला होता. या सत्तांतरानंतर एकमेकांना अपात्र करण्यासाठी दोन्ही गटांनी हालचाली सुरू केल्या.
महापालिकेतील सत्तांतरानंतर बंडखोर गटाने पक्षाचा गटनेता बदलून ऍड. दिलीप पोकळे यांच्याकडे गटनेतेपदाची धुरा सोपविण्यात आली होती. यादरम्यान महापालिकेत प्रभाग समिती सभापतींची निवड करण्यात आली. त्यात ऍड. पोकळे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या ५७ नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी व्हीप नाकारल्यामुळे ऍड. पोकळे व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करत २७ नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या २७ नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे.