जळगाव प्रतिनिधी | शहरातील रस्त्यांसाठी नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या ४२ कोटी रूपयांच्या निधीवरील स्थ्गिती उठविण्यात आली असल्याने आता शहरातील रस्त्यांची कामे होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या संदर्भात वृत्त असे की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील मूलभूत विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला होता. दोन वर्षे उलटूनही निधी खर्चाचे नियोजन होऊ शकले नव्हते. गेल्या वर्षी कामांची यादी तयार होऊन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्याचे ठरले. त्यानुसार कार्यादेशदेखील देण्यात आले; परंतु राज्य शासनाने कोविडच्या कारणांमुळे निधी खर्चाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आठ महिन्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आयोजित बैठकीत ४२ कोटींतून रस्त्यांची कामे करण्यास मंजुरी दिली होती. त्या बैठकीनंतर बुधवारी या कामांवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला आहे.
दरम्यान ४२ कोटीतील निधींच्या मंजुरीसाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांची त्रिसदस्यीय बैठक होणार आहे. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार प्रस्ताव पुन्हा नगरविकास विभागाकडे जाईल. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार असल्याने नगरविकास विभाग त्यांना कळवणार असल्याची माहिती माजी मंत्री नितीन लढ्ढा यांनी दिली आहे.