जळगाव प्रतिनिधी । लसींचा नवीन साठा नसल्यामुळे जळगाव शहरातील लसीकरण हे सलग दुसर्या दिवशी बंद राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
प्रशासनाने लसीकरणासाठी नियोजन केले असले तरी राज्य सरकारकडून साठाच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून लसींचा नवीन साठा आलेला नाही. परिणामी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसींचे डोस संपण्याच्या मार्गावर आहेत. याचमुळे मंगळवारी शहरातील महापालिकेच्या एकाही केंद्रावर लस टोचली गेली नाही. तर बुधवारी देखील लसीकरण बंद राहणार आहे. अर्थात, यामुळे जळगाव शहरातील नागरिक लागोपाठ दुसर्या दिवशी देखील लसींपासून वंचित राहणार आहेत.
तर, जिल्ह्यात जिथेही लस उपलब्ध आहे तिथे लसीकरण होणार आहे. तथापि, सर्व केंद्रांवर मुळातच लसींचा मर्यादीत साठा उपलब्ध असल्याने बुधवारी अतिशय मर्यादीत प्रमाणात लसीकरण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.