जळगाव प्रतिनिधी । अति सौम्य अथवा कोणतीही लक्षणे नसणार्या रूग्णांना होम क्वॉरंटाईनची परवानगी सहजपणे मिळावी यासाठी कोविड केअर सेंटर्समध्ये एक खिडकी योजना राबविण्यात येणार असल्याचे आज जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले आहे.
कोणतीही लक्षणे नसणारे अथवा सौम्य लक्षणे असणार्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांना प्रशासनाने गृह विलगीकरण म्हणजेच होम क्वॉरंटाईनचा पर्याय आधीच उपलब्ध करून दिलेला आहे. आता याच्या परवानगीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. यानुसार जळगाव महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात असणार्या सर्व कोविड केअर सेंटरमध्ये एक खिडकी या प्रकारातील प्रणाली उभारण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
या एक खिडकीच्या ठिकाणी सकाळी ७ ते रात्री ९ या कालावधी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. ते लक्षणे नसणार्या वा अति सौम्य लक्षणे असणार्या रूग्णांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने होम क्वॉरंटाईनची परवानगी देणार आहेत. यासाठी महापालिका हद्दीत स्वतंत्र प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. तर तालुका पातळीवर नायब तहसीलदारांकडे याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान, एका दिवसात होम क्वॉरंटाईनची परवानगी मिळावी अशी प्रणाली उभारण्यात येणार असल्याचे निर्देश यात देण्यात आलेले आहेत. तर रूग्णाची प्रकृती बिघडल्यास त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यासाठी अन्य बाबी त्याला सांगण्यात येणार आहेत. तर क्वॉरंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी हे निर्देश जारी केले आहेत.