जळगाव प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपासूनचा ट्रेंड कायम राहत गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ६३१ कोरोना बाधीत आढळून आले असून ५७७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सर्वच ठिकाणी रूग्ण कमी झाले असतांना जामनेरात मात्र संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे.
मध्यंतरी कोरोना रूग्णांची संख्या ही बाराशेच्या आसपास होती. तर आता हा आकडा काहीसा कमी झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर आकडा अजून खाली आला. गत तीन-चार दिवसांपासून सातशेच्या आत रूग्ण आढळत आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही पुन्हा एकदा सातशेच्या आत म्हणजेच ६३१ इतकी झाली आहे. तर गत चोवीस तासांमध्ये ५७७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज दिवसभरात जिल्ह्यात ११ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजच्या रूग्णसंख्येचा विचार केला असता पुढील प्रमाणे रूग्ण आढळून आले आहेत. जळगाव शहर-३४; जळगाव ग्रामीण-३१; भुसावळ-५४; अमळनेर-३३; चोपडा-१९; पाचोरा-५२; भडगाव-००; धरणगाव-३६; यावल-१५; एरंडोल-२३; जामनेर-१४५; रावेर-३२; पारोळा-३८; चाळीसगाव-६९; मुक्ताईनगर-९; बोदवड-३६ आणि इतर जिल्ह्यांमधील ५ असे रूग्ण आढळून आले आहेत.
आजचे वैशिष्ट्य म्हणजे भडगाव तालुक्यात एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेला नाही. तर जामनेर तालुक्यात मात्र तब्बल १४५ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने तेथील संसर्गात मोठी वाढ झाल्याचे अधोरेखीत झाले आहे.