जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात ऑक्सीजन घेऊन येणारा टँकर हा साधारणपणे तासाभरात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तर, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे स्वत: ऑक्सीजन स्टोअरेज टँकजवळ ठाण मांडून बसले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा रूग्णालयातील ऑक्सीजनच्या टँकमध्ये उत्पादकांकडून टँकरमधून आलेला प्राणवायू हा स्टोअर करून याला वापरण्यात येते. यात सध्याला सहा तास पुरेल इतका प्राणवायू उपलब्ध आहे. तर ऑक्सीजनचा टँकर हा आज सायंकाळपर्यंत जिल्हा रूग्णालयात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, आतापर्यंत हा टँकर आलेला नसल्यामुळे थोडे काळजीचे वातावरण निर्मित झाले आहे.
या संदर्भात या संदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी माहिती देतांना सांगितले की, आम्ही सायंकाळपासून टँकरच्या ड्रायव्हरशी संपर्क साधत असलो तरी संपर्क होत नसल्याने थोडा काळजीचा विषय आहे. तथापि, कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आम्ही दुसरी व्यवस्था करून ठेवलेली आहे. यात जळगावच्या औद्योगिक वसाहतीतील शिवम या ऑक्सीजन उत्पादन करणार्या कंपनीतून मोठे सिलेंडर भरून आणण्याची तयारी करण्यात आलेली आहे. ऑक्सीजनवर असणार्या प्रत्येक रूग्णाला नियमीतपणे ऑक्सीजन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साधारणपणे १८ ते २४ तासांपर्यंत ऑक्सीजन पुरेल इतकी व्यवस्था आतापर्यंत करण्यात आलेली आहे. यामुळे रूग्ण वा त्यांच्या आप्तांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले आहे.
दरम्यान, रात्री उशीरा ऑक्सीजन घेऊन येणार्या टँकर चालकाशी संपर्क साधण्यात आला असून तो पारोळ्याच्या पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे साधारणत: तासाभरात हा टँकर जिल्हा रूग्णालयाच्या आवारातील ऑक्सीजन स्टोअरेज टँक येथे दाखल होणार आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे या घटनेची माहिती मिळताच थेट ऑक्सीजन स्टोअरेज टँकजवळ ठाण मांडून बसले आहेत. येथे प्राणवायूचे योग्य नियोजन करण्यात आले असून रात्री उशीरा टँकरमधील ऑक्सीजन या स्टोअरेज टँकमध्ये टाकण्यात येईल अशी माहिती डॉ. रामानंद यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना दिली.