जळगावात उद्यापासून रूग्ण शोध मोहिम

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कोरोना रूग्णांची Corona Patients वाढीव संख्या लक्षात घेता उद्या दिनांक २६ मार्चपासून रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात येत असल्याची माहिती आज महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आयुक्त म्हणाले की, शहरात Corona Patients कोरोनाची वाढती संख्या बघता मनपा हद्दीत मनपाच्या 10 हेल्थ सेंटर कार्यान्वित असून या माध्यमातून रुग्णशोध मोहीम शुक्रवार, 26 मार्चपासून सुरु करण्यात येत आहे. या मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करुन योग्य ती माहिती द्यावी, असे आवाहन आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.

शहरात अनेक नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईसाठी मनपाची चार पथक असून सुभाष चौक परिसरासाठी स्पेशल टीम तयार करून पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली जाणार आहे.

शहरात पिंप्राळा, खोटेनगर, कांचननगर, अयोध्यानगर, गणेश कॉलनी, शिवकॉलनी भाग हॉटस्पॉट आहे. वाढती रुग्णसंख्या बघता गृह विलगीकरणाच्या नियमात बदल केले असून परवानगीसाठी मनपाच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर शहरातील नेरीनाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल. तर नॉन कोविडसाठी पिंप्राळा, मेहरुण आणि शिवाजीनगर येथील स्मशासनभूमीत अंत्यविधी करता येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

जळगाव शहरात लवकरच कोरोना रुग्ण शोध मोहिम सुरू होणार आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे आवश्यक असून ज्यांना लक्षणे वाटतात त्यांनी लगेच कोरोनाची चाचणी करूण घेणे आवश्यक आहे. शोध मोहिमेला आलेल्या पथकाला माहिती न लपवता योग्य माहिती देवून सहाकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

नियमांचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाची स्थिती अजून बिकट होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे विनामास्क, नियमांचे उलंघन करणार्‍यांवर अजून तीव्र स्वरुपात कारवाई करण्यात येणार आहे. पुन्हा तीन दिवस लॉकडाऊनसाठीसुद्धा पोलीस प्रशासन सज्ज असून प्रत्येकाने मी जबाबदार या अभियानानुसार स्वयंशिस्त पाळावी, असे पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे म्हणाले. पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयासाठी 40 बेडचे कोविड केअर सेंटर शुक्रवारपासून पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Protected Content