जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येने आज एक लाखाचा टप्पा ओलांडला असून ३७८ दिवसांमध्ये एक लाख लोकांना कोविडची बाधा झालेली आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण २८ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. फिरोज शेख नावाचा हा रूग्ण कोरोनावर मात करून आता निरोगी आयुष्य जगत आहे. पहिल्यांदा कोरोनाची रूग्णसंख्या ही मर्यादीत प्रमाणात होती. सप्टेबर महिन्यापर्यंत मात्र ही संख्या वाढतच गेली. यानंतर मध्यंतरी रूग्ण कमी झाले. तथापि, १५ फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा कोरोनाचे रूग्ण वाढीस लागले आहेत. तर आज ११८५ पेशंट आढळून आले असून यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आजवरचा आकडा हा १००६४१ वर पोहचला आहे. यातील ८७१४९ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून १७७६ जणांना मात्र प्राण गमवावे लागले आहेत. सध्या जिल्ह्यात ११७१६ पेशंटवर उपचार सुरू आहेत.
गेल्या ३७८ दिवसांमध्ये जळगाव शहरातील तब्बल २६,४१९ रूग्ण बाधीत झाले असून जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्येच्या २६ टक्के पेशंट हे जळगावातीलच आहेत. तर जळगाव शहरातून सर्वाधीक ४२२ पेशंटचा मृत्यू झालेला आहे.
उर्वरित जिल्ह्यातील आजवरची एकूण रूग्णसंख्या ही पुढीलप्रमाणे आहे. जळगाव ग्रामीण- ३९९६; भुसावळ- ८५०४; अमळनेर ६७८८; चोपडा-११५५०; पाचोरा-३१३७; भडगाव-२९३३; धरणगाव-४१७८; यावल-३१६४; एरंडोल-४५४२; जामनेर-६२८०; रावेर-३५२८; पारोळा-३७४०; चाळीसगाव-६३९५; मुक्ताईनगर-३०३१; बोदवड-१७०८ आणि बाहेरच्या जिल्ह्यांमधील-७४८ असे आजवर कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.