जळगाव प्रतिनिधी । मध्यंतरी जळगाव शहरात कोरोनाच्या संसर्गात लक्षणीय घट आल्याचे दिसून आले होते. तथापि, आज पुन्हा रूग्ण वाढल्याचे रिपोर्टमधून अधोरेखीत झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने गत २४ तासांमध्ये जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज जिल्हाभरात ३२ नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ३४ जणांनी आजच कोरोनावर मात केली आहे. आधीच्या आकडेवारीचा विचार केला असता गत २४ तासांमधील रूग्णांची संख्या ही फार मोठी नाही. तथापि, यातील एक चिंतेची बाब म्हणजे काल जळगावात एकच रूग्ण असतांना आज याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. आज जळगाव शहरात १७ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. उर्वरित जिल्ह्यात भुसावळात-६; अमळनेरात-२; रावेर-४; चोपडा-१; यावल-१ आणि इतर जिल्ह्यांमधील १ असे रूग्ण आहेत.
दरम्यान, गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आजच्या अखेरीस जिल्ह्याचा रिकव्हरी रेट हा ९६.८९ टक्के असून मृत्यू दर २.३८ टक्के असल्याचे प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.