गुड न्यूज : जिल्ह्यात २० हजार रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आजवर २० हजार कोविड-१९ विषाणूने बाधीत झालेल्या रूग्णांनी यावर मात केली असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७२ टक्क्यांवर गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे आज जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनातून बरे होणार्‍या रूग्णांची संख्या आता वाढीस लागली आहे. सोमवारी अर्थात ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळपर्यंत एकाच दिवशी रोजी ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. रात्रीपर्यंत १९ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज अजून काही रूग्णांना डिस्चार्ज मिळाल्याने बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही २० हजारांच्या पार गेली आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार ४२ क्टीव्ह रुग्ण विविध सेंटरमध्ये उपचार घेत असून पैकी २८१४ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत १ लाख २७ हजार ३१२ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणार्‍या रुग्णांची संख्या वाढली असून ही दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ६५ हजार ८१४ तर रॅपिड न्टीजेन टेस्टद्वारे ६१ हजार ४९८ अशा एकूण १ लाख २७ हजार ३१२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९८ हजार ४२८ चाचण्या निगेटिव्ह तर २७ हजार ५९१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून ३९२ अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात सध्या ७ हजार ४२ बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार ११ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५७२, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २ हजार ८१४ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही ३८० रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले ५ हजार ८२५ रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २१७ इतकी आहे. यापैकी ५४९ रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून १८१ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा प्रथमच २.९५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये १२ हजार ५४६ इतके बेड आहेत. यात २१० आयसीयू बेड तर १ हजार ५७८ ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

जिल्हावासियांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे – पालकमंत्री

जिल्ह्यातील नागरीकांनी कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच तातडीने आपल्या नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. तेव्हा नागरीकांनी शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Protected Content