जळगाव, प्रतिनिधी | येथील संस्कार परिवार आणि श्री ओंकारेश्वर मंदिर देवस्थानतर्फे सोमप्रदोषदिनी सोमवार दि. २९ रोजी भव्य १०८ कावड यात्रा शहरात काढण्यात येणार असून असून त्यासाठी जय्यत तयारी सुरु झाली अशी माहिती पत्रकार परिषदेत गुरुवारी देण्यात आली.
चिमुकले राम मंदिर देवस्थान येथे सकाळी ६.३० वाजता दादा महाराज जोशी यांचे हस्ते कावडांची विधिवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व महिला तांब्याच्या २ कळसांसह जरीच्या कापडाने सजविलेल्या कावड घेवून यात्रेत सहभागी होणार आहेत. कळसांमध्ये नर्मदा, गंगा, समुद्र, गिरणा यांचे जल भरून सर्व १०८ कावड महिला घेवून निघणार असून यात्रेमध्ये वारकरी भजन म्हणत टाळ, मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात सहभागी होणार आहे. यावेळी हर हर महादेव, ओम नमः शिवाय चा जप करीत यात्रेत हजारो भाविकही सहभागी होणार आहे. यात्रेचा समारोप सकाळी ९ वाजता होणार असून ओंकारेश्वर मंदिरात पोहोचल्यानंतर विधिवत पूजा, स्वागत झाल्यावर कळसातील जलाद्वारे विधिवत मंत्रोचारात शिवपिंडीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यावर वरूण राजाची कृपा व्हावी याकरिता यावेळी साकडे घालण्यात येणार आहे. यासाठी भाऊजी वारकरी शिक्षण संस्था, धरणगाव, जळगावची सालासर भक्त मंडळ, अयोध्या नगर स्वस्तिक भक्त मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे. यावेळी तीर्थप्रसाद वितरण होणार असून भाविकांनी सकाळी ६.३० वाजता चिमुकले राम मंदिर, नवीन बसस्थानकासमोर येथे यात्रेत सहभागी होण्यासाठी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्कार परिवारच्या अध्यक्षा संतोष नवाल, समन्वयिका सुषमा झंवर,
ओंकारेश्वर देवस्थानचे विश्वस्त जुगलकिशोर जोशी यांनी केले आहे.