जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी नगरसेवक तथा जागरूक समाजसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आज अतिशय करूण पध्दतीत आपल्या आयुष्याचा अंत केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.
नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी हे जळगाव महापालिकेतील अतिशय सक्रीय असे नगरसेवक म्हणून गणले जातात. त्यांनी दोन पंचवार्षिकमध्ये आपल्या कामाची छाप उमटवली आहे. तसेच, अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा पुढाकार असून एक डॅशींग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती.

आज अचानक त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याचे वृत्त येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले असून तेथे त्यांचे आप्त, मित्रमंडळी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने जमली आहे.
प्राप्त माहितीनुसार अनंत उर्फ बंटी जोशी हे शुक्रवारी दुपारपासून घरून निघून गेले होते. त्यांचा फोन देखील बंद येत होता. घरचे त्यांना शोधत होते. अचानक त्यांचे बंधू हे वरच्या मजल्यावर असलेल्या अडगळीच्या खोलीत शोधण्यासाठी गेले असता त्यांना अनंत जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने बंटी जोशी यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तथापि, आधीच त्यांचे प्राण गेलेले होते.
अनंत उर्फ बंटी हरदास जोशी ( वय 48) यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे. ते अतिशय उमद्या स्वभावाचे असून त्यांचा मित्र परिवार खूप मोठा होता. त्यांच्या अकस्मात जाण्याने मित्र परिवाराला देखील मोठा धक्का बसला आहे. अनंत जोशी यांच्या पार्थिवाचे शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येणार असून यानंतर त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बंटी जोशी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच अनेक मान्यवरांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली आहे. यात प्रामुख्याने आमदार राजूमामा भोळे, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता. दरम्यान, अनंत जोशी यांनी इतक्या टोकाचा निर्णय कोणत्या कारणामुळे घेतला ? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यांनी मृत्यूपुर्वी नोट लिहून ठेवली आहे की नाही ? याची देखील माहिती मिळाली नाही.



