जळगाव प्रतिनिधी । आजारी असलेल्या नातवाला पाहण्यासाठी घर बंद करून गेलेल्या महिलेच्या घरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात ठेवलेले सोने-चांदी, रोख रक्कमसह ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छायाबाई पांडुरंग पाटील (वय ४५) रा. शिवबाबा मंदिराजवळ समता नगर ह्या पाचोरा येथे राहत असलेल्या मुलाचा मुलगा आजारी असल्या कारणामुळे त्याला पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून गेल्या. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरात ठेवलेले ५० हजार रुपये रोख, १६ हजार रुपये किमतीची ८ ग्रॅमची सोन्याची माळ आणि १२ हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम सोन्याचे मणी असा एकूण ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. आज सकाळी त्या घरी आल्यावर त्यांना घराचे कुलूप तोडलेले व घरातील पलंगावर समान अस्तव्यस्त पडलेला दिसले. याबाबत रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. छायाबाई पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांनी विरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकाँ इन्द्रेकर करीत आहे.