जळगाव प्रतिनिधी । कधी काळी जिल्ह्यात बडे प्रस्थ म्हणून मानल्या गेलेल्या व सध्या मुंबईच्या वलयांकीत विश्वात ख्यातनाम असणारे अंतीम तोतला यांच्या पत्नीला बीएचआर घोटाळ्याप्रकरणी ताब्यात घेतल्याने या गैरव्यवहाराला व्यापक वळण मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंतिम तोतला हे नाव स्थानीक पातळीवर सध्या फारसे परिचीत नसले तरी एक काळ या माणसाने मोठ्या प्रमाणात गाजवला होता. साधारणत: दोन दशकांपूर्वी नॅप्था किंग म्हणून अंतिम तोतला ओळखले जात होते. तेव्हा पेट्रोलमध्ये नॅफ्था मोठ्या प्रमाणात मिसळला जात असे. यातील सर्वात मोठे खिलाडी म्हणून त्यांची ख्याती झाली. यातून ते अनेकदा कायद्याच्या कचाट्यातही सापडले होते. मात्र ‘हाय लेव्हल’ राजकीय कॉन्टॅक्टमुळे ते यातून सही सलामत सुटले. तर गेल्या अनेक वर्षांपासून अंतीम तोतला हे मुंबई येथे स्थायीक झाले आहेत. एखाद्या सेलीब्रिटीप्रमाणे लाईफ स्टाईल असणारे अंतिम तोतला हे अनेक चित्रपट कलावंतांसोबत आता दिसू लागले आहेत.
या पार्श्वभूमिवर, आज पहाटे त्यांची पत्नी जयश्री अंतीम तोतला यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर येताच जुन्या-जाणत्या मंडळीला या खिलाडी माणसाची बीएचआरमधील एंट्री ही लक्षणीय वाटत आहे. मालमत्ता खरेदी प्रकरणाशी संबंधीत ही अटक असू शकते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे तोतला यांच्या पाठोपाठ त्यांच्याशी संबंधीत अजूनही इतर मंडळी यात गोत्यात येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.