पुणे प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्था घोटाळ्याप्रकरणी एकाच दिवशी अटक करण्यात आलेल्या सर्व संशयितांना आज पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
बीएचआर घोटाळ्यात गेल्या महिन्यात जळगाव व जामनेरसह अन्य ठिकाणी धरपकड करण्यात आली होती. यात ख्यातनाम व्यावसायिक भागवत भंगाळे, उद्योजक प्रेम कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला, जितेंद्र पाटील, छगन झालटे, आसिफ मुन्ना तेली, जयश्री तोतला, प्रितेश जैन, अंबादास मानकापे आदींसह इतरांचा समावेश होता. या सर्वांच्या जामीन अर्जावर कालच सुनावणी पूर्ण झाली होती.

दरम्यान, आज या सर्व संशयितांच्या जामीनावर पुणे येथील न्यायालयाने निकाल दिला. यात सर्वच्या सर्व अकरा संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने आज जामीन देतांना काही अटी टाकल्या आहेत. यात प्रामुख्याने प्रत्येक संशयिताने आपल्याकडे पावत्या मॅच केल्याच्या रकमेच्या २० टक्के रक्कम ही दहा दिवसांच्या आत भरावयाची आहे. तसेच प्रत्येकाला एक लाख रूपयांचा जातमुचलका भरावा लागणार आहे.
दरम्यान, दुसरीकडे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तथा बीएचआरचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्याकडून मात्र आर्थिक गुन्हा शाखेला चौकशीत महत्वाची माहिती मिळाली असून या अनुषंगाने पुढील तपास होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर, दुसरा मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा अद्यापही पोलिसांना आढळून आलेला नाही.


