जळगाव प्रतिनिधी । कोणत्याही दबावाला भीक न घालता विविध घोटाळ्यां विरूध्द ठामपणे उभे राहणारे अॅड. विजय पाटील हे आता बीएचआर प्रकरणात त्रयस्थ अर्जदार म्हणून कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली. यात अजूनही काही बडे मासे समाजात राजरोसपणे फिरत असून त्यांना अटक करण्यासाठी आपण दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आता बीएचआरची पाळेमुळे समोर येतील हा विश्वास निर्माण झाला आहे. तर यातून ठेविदारांना न्याय मिळावा ही अपेक्षा देखील व्यक्त करण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासामध्ये दिवंगत नरेंद्र भास्कर पाटील यांनी भ्रष्टाचाराविरूध्द दिलेला लढा हा कुणी विसरू शकणार नाही. विशेष करून जळगावातील बलदंड सत्तेला नेस्तनाबूद करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता हाच वारसा त्यांचे बंधू अॅड. विजय भास्कर पाटील हे समर्थपणे चालवत आहेत. त्यांनी बीएचआर गैरव्यहार प्रकरणी पहिल्यापासून पाठपुरावा सुरू ठेवलेला आहे. याचमुळे बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याने इतरांच्या मदतीने अब्जावधी रूपयांचा केलेला गैरव्यवहार समोर आला. यामध्ये आजवर अनेकांना अटक करण्यात आली असली तरी अजून बरेच काही मोठे मासे अडकले नव्हते. अजून देखील काही म्होरके बाहेर असून काही प्यादे अडकले असल्याचे चित्र होते. आजच्या अटकेनंतर हे चित्र बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अॅड. विजय भास्कर पाटील यांनी जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक मंडळात सुनील झंवर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मदतीने कसा हस्तक्षेप करत होता याबाबत जाहीर वाच्यता केली आहे. या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तर आजच्या अटकेनंतर ते याच प्रकरणात त्रयस्थ अर्जदार म्हणून कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी वार्तालाप करतांना त्यांनी ही माहिती दिली. अॅड. पाटील म्हणाले की, बीएचआर प्रकरणात आजवर अटक करण्यात आलेली मंडळी ही हिमनगाचे टोक आहे. यात अनेक बडे मासे अडकणार आहेत. कारण त्यांच्या विरूध्द घोटाळ्याचे थेट कागदोपत्री पुरावे आहेत. आपण या प्रकरणी आजवर ठेविदारांच्या पाठीशी उभे होतो. आणि पुढे देखील राहू असे अॅड. पाटील म्हणाले.
दरम्यान, बीएचआरमध्ये आता अॅड. विजय पाटील यांची अधिकृत एंट्री होणार असल्याचे या प्रकरणाची पाळेमुळे समोर येण्याची शक्यता दुणावली आहे. आणि हो, हे सारे होत असतांना बीएचआरमध्ये आपल्या आयुष्याची कमाई गमावून बसलेल्या हजारो ठेविदारांना त्यांची हक्काची रक्कम परत मिळावी ही अपेक्षा देखील निर्माण झालीच आहे.