जळगाव प्रतिनिधी । जळगाव येथील एक अल्पवयीन गतीमंद मुलगी भिवंडीत रस्त्यावर बेसहारा फिरतांना आढळून आली असून तिला पोलीसांनी महिला निरीक्षण गृहात दाखल केले आहे. ही मुलगी पाच महिन्याची गर्भवती असून तिला केवळ जळगाव आणि “मामाने मला सोडले” एवढेच बोलता येत असल्याने पोलीस हवालदिल झाले आहेत. अशा प्रकारची मुलगी हरवली असल्यास त्यांनी भिवंडी पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ठाणे येथील महात्मा फुले पोलीस चौकीच्या हद्दीत 29 मे 2019 रोजी सायंकाळी 5 वाजेच्य सुमारास पोलीसांच्या गस्ती दरम्यान एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेवारस स्थितीत आढळून आली. पोलीसांनी तिला ताब्यात घेतले असून तिची वैद्यकिय तपासणी केली असता ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिला भिवंडी येथील निरीक्षण गृहात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही अल्पवयीन मुलगी गतीमंद असल्याने तिला फारसे काहीही आठवत नाही किंवा बोलताही येत नाही. तिची अधिक चौकशी केली असता ती फक्त “जळगाव” आणि “मामाने मला सोडले” एवढे दोन शब्द उच्चारते. ती गर्भवती असल्याने तिला मामाने का सोडले?, नेमकी मुलगी कोणाची? तिला ठाण्यात कधी आणले?, तिच्यावर झालेला अत्याचार हा जळगाव झाला की ठाण्यात झाला ? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. वरील वर्णनाची मुलगी जळगावातून बेपत्ता झाली असल्यास तिच्या पालकांनी या संदर्भात भिवंडी येथील पोउनि डी.एल.कोळी यांच्याशी (9967837897) किंवा जळगावातील रामानंद नगर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन भिवंडी येथील पोलीसांनी केले आहे.