मराठा समाजाची संस्था वेठीस का धरतात : अशोकराव शिंदे यांचा संतप्त सवाल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | राज्याच्या राजकारणात गाजत असलेला पेनड्राईव्ह बॉंब आणि यातून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या केंद्रस्थानी आहेय तो जळगावच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचील सत्तासंघर्ष ! नेमक्या याच मुद्यावरून छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष आणि रेड स्वस्तीक सोसायटीचे राष्ट्रीय सचिव अशोकराव शिंदे यांनी अतिशय सडेतोड अशी भूमिका जाहीर केली आहे. मराठेतर नेत्यांच्या हातचे बाहुले बनून दोन कुटुंबांनी संपूर्ण समाजाला आणि समाजाच्या संस्थेला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा अशोकदादा शिंदे यांची नेमकी काय भूमिका आहे ते ?

अशोकदादा शिंदे यांनी समाजमाध्यमांमध्ये एका पत्राच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्यासाठी हे पत्र जसेच्या तसे सादर करत आहोत.

काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉँब बाबत प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे,पेन ड्राईव्ह खरे की बनावट का तोडमोड करून बनवले याबाबतही समर्थक व विरोधकांची जुगलबंदी सुरू आहे,आम्ही सर्व हे दररोज पहातो व ऐकत आहोत,
यातील खर्‍या खोट्या बाबत एक मराठा म्हणून तसे मला काहीही घेणेदेणे नाही.. राजकारणात सध्या एकमेकांवर चिखल फेकी पेक्षा संडासातील घाण फेकण्याचे प्रकार पदोपदी दिसून येत आहेत कोणी कोणती घाण फेकावी हा त्यांचा त्यांचा अधिकार आहे, परंतु या पेन-ड्राईव्ह प्रकरणाच्या केंद्रस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्था हे नाव आल्यानं व मी त्या संस्थेचा जबाबदार सभासद व मतदार असल्याने मला काही गोष्टी समाजाशी शेअर कराव्या असे वाटल्याने हा लेख लिहिला आहे..

महाराष्ट्रभर जोरात चर्चेत असणार्‍या पेनड्राईव्ह प्रकरणात उल्लेखित असणार्‍या मराठा विद्या प्रसारक संस्थेतील सत्ताकारण आहे आणि या सत्ताकारणाला खेळवणारे जे नेते आहेत ते मुळात बिगर मराठा तर आहेतच पण मराठा व्देषीही आहेत.आणि या संस्थेत ठाण मांडुन बसलेले तथाकथित स्वयंघोषित संस्थाचालक मराठा हे कठपुतली म्हणून या नेत्यांची हुजरेगिरी करत आहेत हे आता जगजाहीर झाले आहे.

मला एका विचारवंताने औरंगजेबाच्या नातवाची गोष्ट सांगीतली. त्यामध्ये औरंगजेब चा नातू औरंगजेबला मरताना विचारतो की,आपण मराठ्यांच्या विरुद्ध जंगजंग पछाडलं संपूर्ण शक्ती पणाला लावली,दिल्लीचा तक्त सोडून आपण दख्खन मधे आलात आपली एव्हडी प्रचंड शक्ती असताना हत्ती घोडे दारूगोळा, लाखोंच्या संख्येने सैन्य असतांनाही आपण मराठ्यांच्या विरुद्ध जिंकू शकले नाही,तेव्हा औरंगजेब कळवळून आपल्या नातवाला सांगतो की, मला खरच मरतानाही खूप मोठे दुःख आहे. तो नातवाला सांगतो की,तुला जर या मराठ्यांच्या विरुद्ध जिंकायच असेल तर एक तर या मराठ्यांमध्ये फूट पाड आणि शक्य झाले नाही तर मराठ्यांना आमिष दाखवून विकत घे. औरंगजेबाचे स्वप्न त्याच्या नातवाच्या हायातीतही पूर्ण होऊ शकले नाही,कारण शहाजी राजे, जिजाऊ मांसाहेब,छत्रपती शिवराय संभाजीराजे,महाराणी ताराराणींच्या विचारांनी-प्रेरणेने भारावलेले मराठे जिवाची बाजी लावून लढत होते, व रयतेच्या राज्याला उराशी बाळगून स्वाभिमानाची मशाल तेवत ठेवून होते.

आज जळगाव जिल्ह्यात औरंगजेबाचे स्वप्न मराठा विद्या प्रसारक संस्थेत पुर्ण करण्यासाठी अनेक जण यशस्वी झाले आणि आमचे जिल्ह्यातील तथाकथित स्वयंघोषित सर्वोच्च मराठा नेते लाचार झाले आणि विचार गहाण ठेवले गेले हे कोणीही नाकारू शकणार नाही.. मायबाप संस्था बेवारस झाली आहे का?असा प्रश्न मनात येतोय….त्याचे उत्तर, होय असेच येत आहे,सत्तेच्या साठमारीत राजकीय लाचार मराठा नेत्यांनी मराठा विद्या प्रसारक संस्था अक्षरशः बेवारस करून टाकली आहे,१९१८ साली तत्कालीन समाज धुरिणांनी बहुजन मराठा समाजाला शैक्षणिक प्रगतीची दार उघडण्यासाठी प्रचंड परिश्रम घेऊन ही संस्था उभी केली.ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांनी संस्थेला जागा विकत घेऊन दिली. त्यांनंतर अनेक सामाजिक नेत्यांनी पदरमोडच नाही तर श्रम वेळ देऊन श्रमदानाने शाळा ऊभारुण जिल्हाभर शैक्षणिक चळवळ उभी केली. जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे मुख्यकेंद्र मराठा विद्या प्रसारक संस्था झाली.

सर्व अठरापगड समाजातील लाखो विद्यार्थ्यांची मायबाप संस्था झाली. गेल्या काही काळापासुन या अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुजन समाजाचा संस्थेचे खच्चीकरण करण्यासाठी अनेक बिगर मराठ्यांनी नियोजनबद्ध फूट पाडून शैक्षणिक पावित्र्य नष्ट करण्यासाठी पडद्यामागून शक्ती पणाला लावली आहे. शंभर वर्षानंतर या मायबाप संस्थेची परिस्थिती पाहिली असता ही दुर्दैवी दशा या जिल्ह्यातल्या मराठा संस्थेची व्हावी अतिशय वाईट जिव्हारी लागणारी बाब आहे. माझ्या माहितीप्रमाणे कधीतरी एका व्यक्तीने तत्कलीन संस्थाचालक असलेल्या नेत्याच्या गाडीवर एक दगड फेकला,आणि संस्था चालवणारे संस्था सोडून पळून गेले. जाण्याआधी त्याच व्यक्तीकडे पदभार सन्मानजनक सोपविला गेला, स्वतःला मान्यवर प्रतिष्ठित समजणारी मराठा मंडळी घाबरून सत्तेचा त्याग करून गेली अशी कायम चर्चा असते, आणि तिथूनच संस्थेच्या वाताहतीला सुरुवात झाली अशी नेहमी चर्चा ऐकायला मिळते.

याच व्यक्तीच्या दहशतीखाली अनेक वर्षे प्राचार्य, प्राध्यापक शिक्षकांपासून,अशैक्षणिक कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असत.याला विरोध करुन सत्ताची महत्त्वाकांक्षा ठेऊन अनेक कारणाने त्या व्यक्तीच्या दहशती विरोधात मराठा समाजातील आणखी एक गट संघर्ष करू लागला. अनेक वर्षे या संघर्ष सुरू होता,पण या दोन्ही गटाच्या मागे संघर्ष करण्यासाठी शक्ती देणार्‍या वेगळयाच राजकीय शक्ती होत्या व त्या कट्टर मराठा समाजविरुद्ध आहेत याची समाजात कायम कुजबुज होती आणि ती आता जग-जाहीर झाली. यामध्ये विशेष हे आहे हे दोन्ही गट समाजासमोर छातीठोक स्वतः सर्वोच्च मराठा नेते म्हणून वावरतात,मिरवतात आणि त्यांना शक्ती देणार्‍या बिगर मराठ्यांचे कायम जोडे उचलणे, हुजरेगिरी करणे ते म्हणतील त्या पेपर वर सह्या करणे असे लाचारीचे उद्योग करतात.असे मला दहा वर्षांपूर्वी एका अत्यंत जबाबदार अधिकार्‍याने खाजगीत सांगीतले होते,आणि आज त्याला सर्व महाराष्ट्र पहात आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी पेन ड्राईव्ह बॉंब टाकल्या च्या बातम्या रंगतदार आहेत. हे षड्यंत्र मोरे नामक व्यक्तीने केल्याचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सांगून खरे असल्याचे अप्रत्यक्ष मान्य केले आणि यामागे एक माजी मंत्री असल्याचे मोरे यांनी सांगून प्रकरणाला वेगळी कलाटणी दिली. तसेच मोरे यांनी ज्या माजी मंत्र्याचे नाव घेतले त्यांच्या बाबतीत तर मा. शरद पवार साहेबांनी कधीकाळी ह्यांच्या बाबतीत ’तोडपाणी’या एकाच शब्दात मत व्यक्त केले होते.. हे कोणीही नाकारणार नाही. तोडपाणी ला इंग्रजी मध्ये कदाचीत ब्लॅकमेलींग म्हणतात. असाच या महोदयांचा एक अनुभव मलाही आला,दोन उदाहरण देतो म्हणजे विषयाचं गांभीर्य लक्षात येईल.

साकेगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचा जेव्हा या महोदयांनी जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माजी शिक्षण मंत्री व जेष्ठ विचारवंत मा. बाळासाहेब चौधरी यांनी मला व्यक्तीगत फोन करून मदतीसाठी सांगितले,मी व माझ्या सर्व सहकार्यांनी ठामपणे मदत केली व ह्यांचे संस्थेचे रक्षण केले,हे चौधरी कुटुंबसुद्धा मान्य करतीलः

त्यानंतर मुक्ताईनगरच्या नरेंद्र तायडे नामक कोळी समाजातील व्यक्तीला अनेक खोटया गुन्हयात अडकवून आयुष्यातून उठवले. त्यावेळी तो ’छत्रपती शिवाजी ब्रिगेड’कडे मदतीसाठी आलाअसता,मी ’छत्रपती शिवाजी ब्रिगेड’च्या माध्यमातून त्या कोळी समाजाच्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलो.व त्याला न्याय मीळवुन देण्यास मदत केली,त्याचा संताप म्हणून या महोदयांनी मला छळण्याचा जोरदार प्रयत्न केला.आकाशपाताळ एक केले.

मी नोकरी करून बेकायदेशीर रित्या मराठा समाजाचे काम करतो म्हणून बडतर्फ करा अशासह माझी जिल्ह्याबाहेर बदली करा मला धमक्या दिल्या,पोलीस चौकशा लावल्या,डिपार्टमेंटल चौकश्या लावल्या. संघटना तोडण्याचे प्रयत्न केले. विविध प्रकारे माझे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न केले.माझ्या सहकार्‍यांना धमक्या देण्यात आल्या,त्यावेळी त्यांची प्रचंड दहशत होती. जिल्ह्यातील एकमेव राजकीय आसामी होती. मी तर मराठा होतो. मी निडरपणे त्याचे सगळे प्रयत्न सहज म्हणून पाडले. त्यावेळी मला सांगताना लाज वाटते की अनेक मराठ्यांनी मला भेटून सांगितले आहे ते फार शक्तिशाली आहेत, खुनशी आहेत,ते मागे लागले की संपवून टाकतात,तुमचा निभाव लागणार नाही असे सल्ले दिले,परंतु माझा आत्मविश्वास प्रबळ होता आणि मी कायम निडरपणे समाजाचे जिल्ह्यात काम केलेले असल्याने न डगमगता सामोरा गेलो,लढलो. माझी चौकशी करणारे अधिकारी अक्षरशः पळुन गेले. या वेळी माझ्या पाठीशी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे हजारो कार्यकर्ते ठामपणे उभे राहिले. शेवटी महोदयांनी मुंबईतील माझ्या एका मार्गदर्शकाकडे जाऊन माझी गैरसमजातून तक्रार केल्याचे सांगितले,कबूल केले. याबाबत मला सांगताना वाईट वाटत आहे की त्या काळी सोशल मीडिया नव्हता आणि कुठल्याही वृत्तपत्रांमध्ये माझी बाजू प्रसिद्ध करण्याची कोणत्याही मीडिया संपादकांची हिंमत नव्हती याचा मी अनुभव घेतला आहे. त्याहीपेक्षा एक स्वतःला मर्द मराठा समाजणारा मराठा संपादकाने माझी बाजु प्रसिद्ध करण्याचे टाळून शेपूट घातल्याचे मी उघड्या डोळ्यांनी पाहिले,भोगले आहे.

समाजाला माझा सवाल आहे की,या राजकीय नेत्यांनी ज्याप्रमाणे मराठा संस्थेत संघर्ष उभा करण्यासाठी शक्ती दिली,तशी त्यांच्या स्वतःच्या समाजाच्या शिक्षण संस्थेत हस्तक्षेप करण्याची त्यांनी हिंमत का केली नाही? हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे…दुःख याचे आहे कि आमच्या संस्थेची नियोजनबद्ध वाताहत करणार्‍या या नेत्यांच्या विरुद्ध कुणी ब्र काढत नाही.शिक्षण संस्था म्हणजे पवित्र असे विद्यामंदिर विद्यार्थ्यांना संस्कारीत करून ज्ञानदान देऊन बलशाली समाज उभे करणार हे विचारपीठ,हे ज्ञानमंदीर ऊभे करण्यात साठी हजारो मराठ्यांनी,बहुजनांच्या आशीर्वादाने हयातभर मेहनत करून उभ्या केलेल्या शिक्षणसंस्थेत दोन घरांण्यांची मालकी अशी एकंदर वातावरण निर्माण झालंय आणि हे दोन्ही घराणी आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी कुणाची तरी लाचारी करतात हुजरेगिरी करतात. या अभद्र राजकारणा विरुद्ध मराठा युवकांनो यलगार करणार की म्हणणार हा कान्हदेश नाही. खानदेश आहे ! इथे थोडी शिवाजीराजांचे स्वराज्य होते. . . इथे तर आतापर्यंत कोणाचेही नेतृत्व मान्य केले कुणाचेही अन्याय सहन केले आहेत ती इथली पिढीजात सवयच आहे.

शिवविचाराच्या तरुण मित्रांनो उठा!

मराठा-बहुजन युवकांनो उठा,जागे व्हा,

आपल्या मायबाप मराठा विद्या प्रसारक संस्थेला वाचवा तिला ऊर्जितावस्था द्या आणि या माय बाप संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसे मिळेल यासाठी सामूहिक प्रयत्न करा एवढीच विनंतीः

जय जिजाऊ!जय शिवराय!!

अशोक एस.शिंदे ( ९४२२२८३२३३ )
संस्थापक.
छत्रपती शिवाजी ब्रिगेड

Protected Content