जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुलाबराव पाटील यांच्यासह आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना जळगाव न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा काही दिवसांपूर्वी धरणगावात पार पडली. यात युवसेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात टिका केली होती. यामुळे त्यांनी पालकमंत्र्यांचा अवमान केल्यासह गुजर समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून धरणगाव पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू जाधव यांनी धरणगाव पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यानुसार भादंवि कलम-२९५ आणि १५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच त्यांना यानंतर भाषण करण्यासाठी बंदी लादण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद कोळी हे पोलीसांच्या हाती लागले नव्हते. यानंतर त्यांनी जळगाव न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावर सोमवारी सुनावणी झाली. यात त्यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.