जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्याच्या हद्दीत असलेल्या आमोदा ते घार्डी रोडवरील विट भट्टीजवळ एका वृद्ध महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, १५ डिसेंबर रोजी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील आमोदा ते घार्डीरोड दरम्यान दिलीप कुंभार यांच्या वीटभट्टीसमोर अज्ञात वाहनाने ७५ वर्षीय वृध्द महिलेला जोरदार धडक देऊन पसार झाला होता. या धडकेत वृध्द महिला जागीच ठार झाल्या होत्या.
यासंदर्भात सुरुवातीला जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. दरम्यान मयत महिलेची ओळख पटली आहे. सदर महिला खाटीकवाडा, यावल जि.जळगाव येथील नजमाबी वाहद कदर शेख असून मेहबूब खाटीक यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकांविरोधात रविवारी १९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल मोरे करीत आहे.