जिल्हा दूध संघावर ‘प्रशासकराज’ : आ. मंगेश चव्हाण यांच्याकडे प्रमुख धुरा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा दूध संघाची विद्यमान कार्यकारीणी कार्यकारीणी बरखास्त करण्यात आली असून यावर मुख्य प्रशासक म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत दहा जणांचे प्रशासक मंडळही राज्य सरकारने नियुक्त केले आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सहकारी दूध संघाची मुदत उलटूनही त्यांना मुदतवाढ मिळाली होती. यातच मंदाताईंची प्रकृती खराब असल्याने गेल्या काही महिन्यांपासून दूध संघाची धुरा ही माजी खासदार वसंतराव मोरे यांच्याकडे आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासकाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आज याला मूर्त स्वरूप आले असून राज्य सरकारने यावर प्रशासक बसविला असून याचा जीआर देखील जारी करण्यात आला आहे.

चाळीसगावचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची जिल्हा दूध संघावर मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशासकीय मंडळात आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख, ओबीसी सेलचे ज्येष्ठ पदाधिकारी अजय भोळे, अमोल चिमणराव पाटील, राजेंद्र वाडीलाल राठोड, अशोक कांडेलकर, अमोल शिंदे, गजानन पाटील आणि विकास पंडित पाटील यांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: