जळगाव प्रतिनिधी | मराठा विद्याप्रसारक मंडळातील वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमिवर तानाजी भोईटे यांच्यासह त्यांच्या गटातील नऊ जणांवर ‘महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ कायद्याच्या अंतर्गत कलम वाढविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या वादातून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक फिर्याद ऍड. विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. यात संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी दबाव टाकून ऍड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी नऊ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच मकोकाप्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे.
विजय भास्कर पाटील यांच्या फिर्यादीनुसार, संस्था ताब्यात घेण्यासाठी भोईटे गटातील सदस्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन, सुनील झंवर, रामेश्वर नाईक यांच्या मदतीने कागदपत्रे देण्याचा बहाणा करून जानेवारी २०१८मध्ये त्यांना पुण्यात बोलावून धमकावले होते. पुण्यातील एका फ्लॅटमध्ये विवस्त्र करून बांधले. मारहाण केली. आठ दिवसांत संचालकांचे राजीनामे नीलेश भोईटेंकडे देण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर अपर पोलिस आयुक्त (पुणे शहर) यांनी यातील नऊ संशयितांच्या विरुद्ध मकोका कायद्याप्रमाणे कारवाई करण्यासाठी कलमांत वाढ केली आहे. यामध्ये तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गोकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भोईटे व शिवाजी केशव भोईटे या नऊ जणांचा समावेश आहे.