जळगाव ( प्रतिनिधी ) भारतीय जैन संघटना गेल्या ३३ वर्षापासून दुष्काळ निवारणाच्या कार्यात सक्रीय असून राज्य शासनाने घोषित केलेल्या १५१ दुष्काळी तालुक्यांपैकी जास्तीतजास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाचे कार्य करण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय कर्नाटक आणि झारखंड या दोन राज्यातील पाच जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्णयही संघटनेने घेतला आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाझर तलाव, गाव तलाव व धरणे यांचे सर्वेक्षण करून जेथून गाळ काढण्याची गरज आहे त्यांची प्राधान्य क्रमानुसार यादी केली जाईल. त्यानुसार त्या कामांना मंजुरी दिली जाईल. त्यानंतर जैन संघटनेमार्फत तिथे आवश्यक ती मशिनरी पुरवण्यात येईल. तलाव आणि धरणांचे खोलीकरण करण्यासाठी गाळ काढण्याच्या कामी या मशिनरीचा वापर केला जाईल. त्यातून शेतकऱ्यांच्या शेतात विनामुल्य हा गाळ पसरवण्यात येऊन एकाचवेळी पाणी साठा वाढवतानाच त्या तालुक्यातील जमीनही सुपीक करण्याचे काम याद्वारे होणार आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारसह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये जैन संघटनेच्या माध्यमातून गाळ मुक्त धरण व गाळ युक्त शिवार या योजनेनुसार काम करण्याचे पत्र राज्य शासनाने संबंधित जिल्हाधिकार्यांना २८ जानेवारीला पाठवले आहे. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.