जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. सौ. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीही जैन इरिगेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात आला. देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये एकूण ४४५ सहकाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले, तर ‘स्नेहाच्या शिदोरी’ उपक्रमांतर्गत जळगावातील ५५० गरजू नागरिकांना मिष्टान्न पाकिटांचे वाटप करण्यात आले.
८ सप्टेंबर रोजी जैन इरिगेशनच्या बांभोरी (प्लास्टिक पार्क), फूड पार्क आणि भारतातील इतर युनिट्स — अलवर, बडोदा, चित्तूर, हैदराबाद, उदमलपेट येथे रक्तदान शिबिरे एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जैन प्लास्टिक पार्कमध्ये सर्वाधिक २१७ सहकाऱ्यांनी रक्तदान केले. फूड पार्कमध्ये ११७, चित्तूरमध्ये २५, बडोद्यात ९, हैदराबादमध्ये ८, उदमलपेटमध्ये ६ आणि अलवर येथे ४ सहकाऱ्यांनी रक्तदान करत समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

प्लास्टिक पार्कमध्ये डेमो हॉलमध्ये, तर फूड पार्कमध्ये प्रशासकीय इमारतीजवळ सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे शिबिर चालले. रेडक्रॉस ब्लड बँक आणि जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. प्लास्टिक पार्क येथील उद्घाटन प्रसंगी रेडक्रॉसच्या चेअरमन मंगला ठोंबरे, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, पीआरओ उज्ज्वला वर्मा, डॉ. राजकुमार वाणी, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, तसेच जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी सी.एस. नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
फूड पार्कमधील शिबिराचे उद्घाटन विजय मुथा यांनी केले. यावेळी व्ही.पी. पाटील, संजय पारख, सुनील गुप्ता, किशोर बाविस्कर आदी उपस्थित होते. येथे गोळवलकर आणि गोदावरी ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
जैन इरिगेशनने सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर आपली ओळख ही केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक उपक्रमांद्वारेही सातत्याने सिद्ध केली आहे. स्व. कांताबाई जैन यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून घेतलेला हा उपक्रम त्यांच्या स्मृतीला वाहिलेली आदरांजलीच ठरली.
एकूणच, रक्तदानासारख्या पुण्यकार्याचा व्यापक प्रसार करत शेकडो सहकाऱ्यांनी एक सामाजिक संदेश दिला आणि ‘स्नेह शिदोरी’द्वारे गरजूंपर्यंत मायेचा स्पर्श पोहोचवण्यात आला.



