जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जैन इरिगेशन लिमिटेडला सिंचनाच्या क्षेत्रातील देदीप्यमान्य कामगिरीबद्दल हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने संगमनेर येथील भव्य कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले. समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम व पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते तर महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला,कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील,कॉंग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमात जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार स्वीकारला. यासोबत, स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हास दादा पवार तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर चे आमदार पी. एन. पाटील यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे मानकरी असलेल्या तिन्ही मान्यवरांना शाल, सन्मानपत्र, १ लाखाचा धनादेश, पुष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप होते.
सत्कारास उत्तर देताना अशोकभाऊ जैन यांनी सांगितले की, आमच्या जैन इरिगेशन कंपनीला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋणी आहे आणि नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारून प्रस्तुत पुरस्कार आमच्या जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, आमचे परमपूज्य पिताजी श्रद्धेय भवरलालजी जैन आणि त्यांच्या समवेत परिश्रम घेणार्या सर्व सहकार्यांना अर्पण करतो.
लक्षणीय बाब म्हणजे भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे, आमचे वडील भवरलालजी हे तिघेही शेतकरी कुटुंबात जन्मले आणि तिघांनीही कृषी क्षेत्रातील कामकाजावर आधारित उद्योगक्षेत्रात काम करून शेतकर्यांच्या कल्याणाची, प्रगतीची, उन्नतीची चिंता वाहून त्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आणि आमच्या वडिलांनी शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी केली तर अण्णासाहेबांनी केंद्रात १५ वर्ष शेती खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळून या देशाच्या कृषी क्षेत्राला धोरणात्मक वळण लावण्याचा प्रयत्न केला आणि वैचारिक मार्गदर्शनही केले.
अशोकभाऊ जैन पुढे म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे आणि आमच्या वडिलांमधील आणखी एक साम्य सांगायचे म्हणजे दोघेही कायद्याचे शिक्षण घेतलेले पदवीधर म्हणजे वकील होते. आण्णासाहेबांनी वकिलीची प्रॅक्टिस करीत करीत आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनानुसार कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून केंद्रात मंत्रीपद सांभाळले आणि आमच्या वडिलांनी मातृप्रेरणेतून उद्योगाचा शुभारंभ केला. घरातून मिळालेल्या सात हजार रुपयातून उद्योगाची सुरुवात झाली. केरोसीन विक्रीने प्रारंभ झाला. भूमिपुत्रांच्या कल्याणाचा ध्यास घेऊन, श्रमप्रतिष्ठेचा अंगीकार करून, आमच्या वडिलांनी आदर्श कार्यसंस्कृतीचा पाया रचला. ६५ एजन्सीतून उद्योजकीय कार्यविश्व समृद्ध होत गेलं. कंपनीचे स्वतःचे कारखाने, प्रकल्प, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानमान्यतेपर्यंत पोहचले.
शेती आणि शेतकर्यांच्या अजोड बांधिलकीसाठी जगभर ३० कारखाने, १४६ कार्यालये आणि डेपो आहेत. ११००० वितरकांच्या जाळ्यासह १२००० हून अधिक सहकारी आहेत. सध्या वार्षिक ७९०० कोटीहून अधिक उलाढाल असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. आजमितीस जगात कृषी पाईंपासहित ठिबक सिंचन उत्पादनात प्रथम, केळी आणि डाळिंबाच्या टिश्यू कल्चर रोप निर्मितीत प्रथम, आंबा फळप्रक्रियेतही प्रथम, कांदा आणि भाजीपाला प्रक्रियेसाठी दुसर्या स्थानी आहे. पुरस्कार आणि सन्मान या संदर्भात अभिमानाने सांगायचं तर… आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय असे एकूण ३२८ पुरस्कारांनी कंपनी सन्मानित झाली आहे.
या पुरस्काराची एक लाख रक्कम न स्वीकारता त्यात जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या वतीने दहा लाख असे एकूण ११ लाख रुपये बाळासाहेब थोरात यांना शेतकर्यांच्या कल्याणासाठी देण्याचे अशोक जैन जाहीर केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून भाऊसाहेब थोरात यांनी शेती, सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल अभिवादन करून त्यांनी आरोग्य, शिक्षण, लघुउद्योग सह सहकार विभागातील कार्य नक्कीच समाजाला प्रेरणा देणारे आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या वतीने आमदार भास्कर जाधव , जितेंद्र आव्हाड यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचे स्वागत माजी आमदार सुधीर तांबे यांनी तर प्रास्ताविक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी संगमनेर व परिसरातील हजारो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.