Home Uncategorized भुसावळात जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्साहात !

भुसावळात जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्साहात !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात रविवार, १७ ऑगस्ट रोजी जाहरवीर गोगादेवजी नवमी उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने रात्री ९ वाजता काढण्यात आलेली छड्यांची मिरवणूक भुसावळकरांसाठी एक विशेष आकर्षण ठरली.

वाल्मिकी समाजाचे आद्य दैवत जाहरवीर गोगादेवजी यांच्या नवमीनिमित्त शहरातील जामनेर रोडवरील मेहतर वाल्मीकी नगरातून या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत विविध आकर्षक आरास आणि चित्ररथांचा समावेश होता, जे नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल-ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण यामुळे मिरवणुकीत उत्साहाचे वातावरण होते.

ही मिरवणूक जामनेर रोडवरून सुरू होऊन स्टेशन रोड, मॉर्डन रोड, गांधी चौकी, सराफ बाजार आणि नृसिंह मंदिर या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गावर रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील विविध भागांमधून नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. या मिरवणुकीचा समारोप पुन्हा वाल्मीकी नगरात झाला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने उत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली. गोगा नवमी उत्सवाच्या निमित्ताने निघालेल्या या छडी मिरवणुकीने भुसावळमधील धार्मिक आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. शांतता आणि उत्साहात पार पडलेल्या या उत्सवाने भुसावळकरांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली.


Protected Content

Play sound