यावल प्रतिनिधी । तालुक्यातील वड्री गावाजवळ असलेल्या जंगलात गुरांना चारण्यासाठी गेलेला युवकावर आज दि. 22 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अस्वलाने हल्ला केला आहे. तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, तालुक्यातील असलेल्या वड्री गावाजवळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी लागुन असलेल्या आशराबारी पाडया वरील राहणारा जगदीश बारेला (वय-३०) हा आज दि. २२ जुलै रोजी नियमीत प्रमाणे आपल्या सहकार्यासोबत सकाळी ९ वाजता जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. मात्र, दुपारी १२ वाजेच्या सुमारास अचानक पिसाळलेल्या अस्वलाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याच्या दोघ पायांचा चावा घेतला आहे. यावेळी त्याच्या सोबत काही अंतरावर असलेल्या गुरे चारणाऱ्यांनी जोरात आरडाओरड केल्यामुळे अस्वालाने जगदीश बारेला याला सोडुन जंगलाच्या दिशेने पळ काढला. बारेला यास जखमी अवस्थेत त्याच्या मित्रांनी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले असुन, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन, आरोग्य सेविका निलीमा पाटील व प्रियंका मगरे यांनी उपचार केला आहे. या घटनेचे माहिती मिळताच वड्रीचे सरपंच ललीत चौधरी यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देवून जख्मी जगदीश बारेला याच्या प्रकृतीची विचारपुस केली आहे.