पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन अन हातात टाळ – मृदुंग घेत वैष्णवांचा मेळावा आज पुण्य नगरीत दाखल झाला. या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने वारकरी संप्रदाय, सामाजिक, कला, संत सेवेकरी, भजन – कीर्तन गायन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या वारकऱ्यांना ‘जगद्गुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज जीवनगौरव पुरस्कार 2024’ देवून सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रख्यात पखवाज वादक ह. भ. प. प्रकाश निंबाळकर, कीर्तनकार ह. भ. प. रतनबाई निंबाळकर, भजन – कीर्तन गायक ह. भ. प. संजय बहिरट, भजन गायक ह. भ. प. कमलाकर महाबळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पालखी विसावा बोपोडी, मेट्रो स्टेशन जवळ रविवारी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यास माजी उपमहापौर सुनीता वाडेकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र संघटक परशुराम वाडेकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, यावेळी विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती व निसर्ग उपचार केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पालखीत सहभागी झालेल्या थकलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत मालिश सेवा प्रदान करण्यात आली. शेकडो वारकऱ्यांनी या मालिश सेवेचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समिंदर घोक्षे यांनी केले.