चेन्नई वृत्तसंस्था । विंडिजविरुद्धच्या चेन्नई एकदिवसीय सामन्यात भारताला निसटता पराभव पत्करावा लागला. हेटमायर आणि शाय होप यांच्या शतकाच्या जोरावर विंडिजने विजय मिळवला. या सामन्यानंतर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, आतापर्यंत मी असे कधीच पाहिले नाही. जडेजा 48 व्या षटकात धावबाद झाला. तेव्हा सुरुवातीला मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते पण तिसऱ्या पंचांनी बाद ठरवले. यानंतर विराट पंचांवर चांगलाच संतापला.
सामन्यातील 48 व्या षटकात जडेजा वेगाने धावत क्रीजच्या जवळ पोहचला असताना रोस्टन चेजने थेट थ्रो मारला. यावेळी विंडिजच्या खेळाडूंनी अपील केलं नाही. त्यामुळे मैदानावरील पंचांनी जडेजाला बादही दिलं नाही. त्यानंतर विंडिजचा कर्णधार पोलार्डने पंचांकडे अपील केलं. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तेव्हा जडेजा क्रीजमध्ये पोहचण्याआधी चेंडू यष्ट्यांना लागल्याचं स्पष्ट झाल्यावर तो बाद असल्याचा निर्णय दिला गेला. जडेजा धावबाद असल्याबद्दल संभ्रमात असलेल्या विंडिजच्या खेळाड़ूंना मैदानाबाहेरून तो बाद असल्याचा इशारा सहकाऱ्यांनी केला. त्यानंतर पोलार्डने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि जडेजा धावबाद असल्याचा निर्णय झाला. जडेजाला बाद ठरवण्याच्या निर्णयावर भारताचा कर्णधार विराट कोहली मात्र नाराज दिसला.