फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेजमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते दृकश्राव्य प्रणाली द्वारे करण्यात आले आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पारंपारिक महाविद्यालयीन शिक्षणासह रोजगारासाठी आवश्यक कौशल्याचे देखील प्रशिक्षण मिळावे तसेच आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना सक्षम बनविण्याच्या उदात्त हेतूने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागाच्या मान्यतेने सुरू करण्यात आलेले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीकोनातून महाविद्यालयीन शिक्षणासह व्यावसायिक कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात ३ हजार ५०० महाविद्यालयांमधून १०० महाविद्यालयांना निवडलेले आहे. प्रत्येक कौशल्य विकास केंद्रातून किमान १५० युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून राज्यात किमान २० हजार युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. या कौशल्य विकास केंद्रातून २०० ते ६०० तासांपर्यंतचे सुसंगत अभ्यासक्रमांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातर्फे आयोजित विविध कोर्सेसचा विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा असे महाविद्यालयीन प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरददादा महाजन, प्राचार्य डॉ के.जी. पाटील,उपप्राचार्य डॉ. जी.ई.चौधरी, समन्वयक किरण पाटील तसेच शासनाचे प्रतिनिधी यावल गव्हर्मेंट आयटीआयचे प्राचार्य पी.एम. तांबट उपस्थित होते.