जळगाव प्रतिनिधी । शहरातील जी.एस. मैदानात आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात जळगावकरांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आयोजक नागेश पुंडलिक पाटील यांना महापालिकेचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी मंगळवारी दंडाची नोटीस बजावली आहे.
दिलेल्या नोटीसात म्हटले आहे की, कोरोना रूग्णांची संख्या जिल्ह्यात कमी झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वेय शहरात व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी कोरोनाचे नियम व अटींच्या अधीन राहून परवानगी दिलेल्या आहेत. याच अनुषंगाने शहरातील कोर्ट चौकातील जीएस मैदानावर आनंद मेळावा सुरू करण्यासाठी शासनाने विशिष्ट अटी शर्तीनुसार परवानगी देण्यात आली होती. हा मेळावा १० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान सुरू करण्याची परवानगी दिली. यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने सोमवारी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली असता मेळाव्यात सुमारे ४०० ते ५०० नागरिक आढळून आले. दरम्यान याठिकाणी काही नागरिकांनी विना मास्क असल्याचे दिसून आले तर सॅनिटायझरची कुठलीही सुविधा आढळली नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात असल्याने महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी यांनी आयोजक नागेश पुंडलिक पाटील रा. जामनेर जि. जळगाव यांना २० हजार रुपये दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल का करू नये? याबाबत खुलासाची नोटीस दिली आहे. आयोजकाने २४ तासाच्या आत आपला खुलासा सादर करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई येईल, असा इशारा उपायुक्त श्याम गोसावी यांनी नोटीसीच्या माध्यमातून दिला आहे.