‘आयर्न लेडी’ बनणार भुसावळच्या डीआरएम : मॅराथॉन रनरसह अष्टपैलू व्यक्तीमत्व !

भुसावळ-इकबाल खान ( एक्सक्लुझीव्ह स्पेशल रिपोर्ट ) | कठोर व कर्तव्यतत्पर प्रशासक, संवेदनशील कवयित्री, कणखर मॅरेथॉनपटू, लेखीका, वक्त्या, मार्गदर्शक आदी विविध भूमिकांमध्ये आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवणार्‍या इती पांडे Ity Pandey Bhusawal DRM यांची भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक अर्थात डीआरएमपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात रेल्वे विभाग आगेकूच करणार आहे. जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचा लेखा-जोखा.

(Image Credit Source: Live Trends News)

भुसावळ येथील मंडळ रेल्वे व्यवस्थापक ( डीआरएम) एस.एक. केडिया यांची बदली झाली असून त्यांच्या जागी इती पांडे यांची डीआरएम म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्या उद्या म्हणजेच १८ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांची नियुक्ती ही अनेक अर्थांनी लक्षणीय आहे. १९२० साली अस्तित्वात आलेल्या म्हणजेच शतकोत्तर इतिहास असलेल्या भुसावळ येथील डीआरएम मुख्यालयाच्या इतिहासात त्या पहिल्या महिला डीआरएम ठरल्या आहेत. याहून लक्षणीय बाब म्हणजे त्या बहुआयामी व्यक्तीमत्व असून एक ‘सेलिब्रीटी’ अधिकारी म्हणून ख्यात आहेत.

कोण आहेत इती पांडे ?

इती पांडे या भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अर्थात ‘आयआरटीएस’ अधिकारी आहेत. १९९५ साली दिलेल्या आणि पुढील म्हणजे १९९६ साली निकाल लागलेल्या परिक्षेत यश संपादन करून त्या रेल्वे सेवेत रूजू झालेल्या आहेत. देशभरात विविध पदांवर कार्य केल्यानंतर त्या अलीकडेच मुंबई येथील मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य प्रबंधक या पदावर कार्यरत होत्या. यानंतर आता त्या भुसावळ येथील डीआरएम पदाची धुरा सांभाळणार आहेत. विशेष बाब म्हणजे काल १६ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असून याच दिवशी त्यांना पदोन्नतीसह बदलीची गोड बातमी मिळाली आहे.

उज्वल करियर

इती पांडे या मूळच्या अलाहाबादच्या ( प्रयागराज ) रहिवासी आहेत. त्यांनी मानशास्त्रातून पदवी संपादन करतांना विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले. युपीएससीच्या परिक्षेत त्यांना ऑल इंडिया १६७ व्या क्रमांकाची रँक मिळाली होती. यानंतर रेल्वे सेवेत रूजू झाल्यानंतर त्यांनी विविध पदे भूषविली. या वाटचालीत अनेकदा त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. त्यांनी पहिल्यांदा माटुंगा रेल्वे स्थानकाला वुमन रेल्वे स्टेशनचा दर्जा मिळवून दिला. २००६ साली त्यांनी रेल्वे सुरक्षा दलातील महिला कर्मचार्‍यांचे स्वतंत्र ‘सुरक्षिनी सेना’ नावाने पथक स्थापन करून महिला प्रवाशांना सुरक्षा प्रदान केली. त्यांना अनेकदा गुणवत्ता पुरस्कार मिळाले असून यात २००७ साली रेल्वे मंत्रालयाचा पुरस्कार तसेच १९९९ आणि २०१६ साली जनरल मॅनेजर्स अवॉर्डने सन्मानीत करण्यात आले आहे. आता मध्य रेल्वेच्या मुख्य वाणिज्य प्रबंधक म्हणून त्यांनी उत्पन्नाच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केल्याची बाब देखील लक्षणीय आहे.

पतींची समर्थ साथ, समाजभान जोपासले

इती पांडे यांचे पती विरेंद्र ओझा हे भारतीय राजस्व सेवा अर्थात आयआरएस अधिकारी असून ते देखील बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून ख्यात आहेत. या दाम्पत्याने ‘मार्गदर्शन’ या नावाने वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना युपीएससीची तयारी करता यावी यासाठी केंद्र सुरू केले आहे. आधी अलाहाबाद मधील विद्यार्थ्यांना यातून मार्गदर्शन करण्यात येत होते. तर आता याला ऑनलाईन पोर्टलमध्ये परिवर्तीत करण्यात आले आहे. यातून ते ऑनलाईन मार्गदर्शन करत आहेत. ते स्वत: ब्लॉगर, लेखक आणि वक्ते आहेत. सर्वात लक्षणीय बाब म्हणजे ते एक उत्तम रनर आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच इती पांडे यांना रनींगमध्ये रूची निर्माण झाली. यातून या दाम्पत्याने अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास प्रारंभ केला.

आपल्या पतींसोबत इती पांडे. (Image Credit Source: Twitter)

मॅरेथॉन रनर

इती पांडे यांना धावण्याची आवड असून त्या नियमीतपणे रनिंग करतात. याच्या जोडीला त्यांनी ७० अर्ध मॅरेथॉन, चार फुल मॅरेथॉन आणि चार अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे. यात गेल्या महिन्यात त्यांनी दक्षीण आफ्रिकेतील अतिशय प्रतिष्ठेची अशी ‘कॉम्रेडस मॅरेथॉन’ शर्यत पूर्ण केली. तब्बल ८८.९ किलोमीटर इतका अतिशय अवघड चढ-उतारांनी युक्त असलेल्या मार्गावरून लागोपाठ ११ तास ४७ मिनिटांमध्ये धावून त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. ही शर्यत शारीरीक आणि मानसिक कसोटी घेणारी असल्याने अगदी नाणावलेले धावपटू देखील ती पूर्ण करू शकत नाही. तथापि, इती पांडे यांनी ही शर्यत वयाच्या ५१ व्या वर्षी पूर्ण करून आपला कणखरपणा सिध्द केला.

लक्षणीय बाब म्हणजे त्यांचे पती विरेंद्र ओझा यांनी आधीच म्हणजे २०१७ मध्ये यात यशस्वी सहभाग घेतला होता. कॉम्रेड मॅरेथॉन रन पूर्ण करणार्‍या त्या पहिल्या भारतीय प्रशासकीय महिला अधिकारी बनल्या असून अशी कामगिरी करणारे पहिले दाम्पत्य म्हणून या पती-पत्नीची नोंद झालेली आहे. तसेच त्या उत्कृष्ट कवयित्री देखील असून त्यांच्या काही कविता समाजमाध्यमांमधून लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून ते दोन्ही उच्च शिक्षण घेत आहेत.

इती पांडे यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे
(Image Credit Source: Twitter)

कोरोना काळातील कामांची वाखाणणी

कोरोनाच्या आपत्तीच्या कालखंडात इती पांडे या मध्य रेल्वेत मुख्य वाणिज्य प्रबंधक असतांना त्यांनी कामगारवर्गाला त्यांच्या घरापर्यंत पोहचवण्यासाठी केलेली मदत ही देखील कौतुकाची बाब बनली होती. त्यांनी श्रमिक एक्सप्रेसचे यशस्वी नियोजन केले. एकदा तर आपत्ती काळ ऐन भरात असतांना स्वत: धोका पत्करून आणि पैसा खर्च करून त्यांनी ३२ कामगारांना श्रमीक एक्सप्रेसपर्यंत पोहचवण्यात मोलाची भूमिका निभावल्याने सोशल मीडियातून त्यांना लोकप्रियता मिळाली होती.

भुसावळातही तडफदार कामाची अपेक्षा

इती पांडे या भुसावळच्या डीआरएम पदाची धुरा सांभाळत असतांना त्या या पदाला न्याय देतील अशी अपेक्षा आहेच. याच्या जोडीला स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्याची देखील गरज आहे. यात प्रामुख्याने केळी उत्पादकांना त्यांचे उत्पादन हे उत्तर भारतात नेण्यासाठी आवश्यक असणार्‍या मालवाहू गाड्या आणि याच्या रॅकची उपलब्धता याबाबत कधीपासूनच ओरड होत असून याचे त्यांनी निराकरण करण्याची गरज आहे. याच्या सोबतीला भुसावळ रेल्वे स्थानकासह अन्य स्थानकांमधील समस्यांचे निराकरण करण्याची अपेक्षा देखील त्यांच्याकडून आहेच. त्यांची भुसावळातील कारकिर्द ही लक्षणीय ठरावी हीच आता सर्वांची अपेक्षा असतांना त्यांना पुढील वाटचालीसाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवारातर्फे शुभेच्छा !

Protected Content