नवीदिल्ली, वृत्तसंस्था | महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच स्पष्ट सांगण्यात आले होते. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली. असा आरोप अमित शाह यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असे काहीही ठरलेले नव्हते, असेही अमित शाह यांनी आज (दि.१३) स्पष्ट केले. महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर अमित शाह यांनी पहिल्यांदाच हे वक्तव्य केले आहे.
विरोधक राज्यपालांनी वेळ दिला नाही हे विरोधकांचं म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतो मात्र त्यांनी साथ सोडली. महायुतीचे मुख्यमंत्री फडणवीस होतील, हे मी भाषणांमध्ये अनेकदा बोललो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा त्यांच्या सभांमधून हेच सांगितले होते. देवेंद्र फडणवीसही हेच सांगत होते, त्यावेळी कोणीही आक्षेप घेतला नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अटी बदलल्या. त्यांच्या नव्या अटी आम्हाला मान्य नाहीत असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
एवढंच नाही तर बंद दाराआड शिवसेनेशी काय चर्चा झाली, ते सांगणे मला योग्य वाटत नाही, कारण माझ्या पक्षाचे माझ्यावर तसा संस्कार नाही असे म्हणत त्यांनी शिवसेनेला नेमके काय वचन दिले होते, ते सांगणं टाळले. आम्ही शिवसेनेचा कोणताही विश्वासघात केलेला नाही तर शिवसेनेने आमची साथ सोडली आहे, असेही शाह यांनी म्हटले. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर महाराष्ट्रातले विरोधक टीका करत आहेत की, आम्हाला पुरेसा वेळ दिला नाही त्याला काहीही अर्थ नाही. ते फक्त राजकारण करत आहेत, असाही आरोप शाह यांनी केला. १८ दिवस सत्तास्थापनेसाठी कुठेही लागलेले नाही. आता राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करुन सहा महिन्यांचा अवधी दिला आहे. ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी जावे आणि सरकार स्थापन करावे असाही टोला अमित शाह यांनी यावेळी लगावला.
राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केली नसती तर आमच्यावर हा आरोप झाला असता की, भाजपाला काळजीवाहू सरकार चालवयाचे आहे. राज्यपालांनी प्रत्येक पक्षाला संधी दिली. मात्र एकही पक्ष त्या संधीचा उपयोग करुन सत्तेचा दावा सिद्ध करु शकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला रात्री ८.३० पर्यंत वेळ देण्यात आली होती. मात्र त्यांनी सकाळी ११.०० लाच राज्यपालांना फोन करुन मुदतवाढ मागितली. राज्यपालांनी त्यानंतर राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, कारण राज्यात पेच निर्माण झाला होता. राज्यपालांचे काही चुकले आहे, असे मुळीच वाटत नाही असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले.