नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेसाठी पुलवामा येथील हल्ला घडवून आणला होता असा खळबळजनक दावा कॉंग्रेस नेते उदित राज यांनी करत आज टीकास्त्र सोडले आहे.
पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत आता भाजप आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, आज कॉंग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट केलंय की, पीएम मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली ढोंगी आणि पुजार्यांचं दुकान आता सुरू झालंय. पंतप्रधान मोदींच्या नौटंकीमुळं आता स्पष्ट झालीय की, सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना स्वतःच घडवून आणली गेलीय, याला जबाबदार कोण? असे ट्विट त्यांनी केले आहे.
या ट्विटमुळे प्रचंड खळबळ उडाली. नंतर या संदर्भात उदित राज यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलंय की, फिरोजपूरमध्ये जे काही घडलंय, त्यालाच नौटंकी म्हटलंय. कारण, पीएम मोदींवर कोणीही गोळीबार किंवा दगडफेक केली नाही, मग मी वाचलो असं ते का म्हणाले? विनाकारण या प्रकरणावरुन पंजाब सरकारला जबाबदार धरलं जातंय, हा मोदींचा नौटंकीपणा नाहीतर काय आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
याला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले, कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या सांगण्यावरून अशी विधानं राज करत आहेत. मी असंही म्हणू शकतो, की राहुल गांधी चीनमधून पैसे घेतात. सोनिया गांधींना पाकिस्तानातून लोकशाही कमकुवत करण्याच्या सूचना मिळतात, पण पुराव्याशिवाय आम्ही कोणावरही निराधार आरोप करत नाही. उदित राज भाजपमध्ये असताना कॉंग्रेसवर आरोप करायचे, आता कॉंग्रेसमध्ये गेले तर भाजपवर आरोप करत आहेत, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला. अर्थात उदीत राज यांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळातील वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.