जनतेचे मन वाचून बातमी लेखन करणे महत्वाचे – अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनतेचे मन वाचून बातमी लेखन करणे महत्वाचे असून वृत्तपत्रातील बातम्यांमधूनच वाचनाची आवड निर्माण होत असल्याचे मत जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेच्यावतीने आयोजित ‘बातमी लेखन’ विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे, दै. दिव्यमराठीचे निवासी संपादक दीपक पटवे, माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सुधीर भटकर, डॉ.गोपी सोरडे, सूर्यकांत देशमुख, रोहित देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ‘बातमी लेखन’ कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

पुढे बोलतांना अप्पर पोलीस अधिक्षक म्हणाले की, वाचकांचे स्वारस्य, वाचकांची अभिरुची लक्षात घेवून बातमी लेखन केले गेले पाहिजे. सामाजिक परिस्थिती, घटनेची पार्श्वभूमी, घटनेचा समाज मनावर होणारा परिणाम ही सर्व माहिती बातमीतून प्रतिबिंबित होत असल्याने वृत्तपत्र हे समाजमनाचा आरसा असल्याचेही ते म्हणाले. वृत्तपत्रांमधून वेगवेगळी माहिती उपलब्ध होत असल्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये वृत्तपत्रांचा फार मोठा वाटा असल्याची भूमिका अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी स्वत:चे उदाहरण देवून मांडली. समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला तरी वृत्तपत्राचे महत्व अबाधित असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी, सकारात्मक पत्रकारिता महत्वाची असल्याचे नमूद करत धोरणात्मक निर्णयामध्ये पत्रकारांची भूमिका महत्वपूर्ण असते. त्यामुळे पत्रकारितेत स्पेशलाईझेशन निवडून सकारात्मक शोध पत्रकारिता करावी, असे सांगितले. प्रास्ताविकात माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी ‘बातमी लेखन’ कार्यशाळेची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन डॉ.गोपी सोरडे यांनी केले तर सूर्यकांत देशमुख यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात ‘बातमी लेखन आणि संपादन’ या विषयावर दै.दिव्यमराठीचे निवासी संपादक दीपक पटवे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बातमी ही एकतर्फी नसावी, भाषेवर प्रभुत्व असावे, माहिती आणि संदर्भ योग्य असावे, प्रसिध्द झालेल्या बातमीत वाचक समरस झाला पाहिजे अशा नानाविध प्रकारच्या टीप्स देवून बातमी लेखन आणि संपादनाचे बारकावे सांगितले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी ‘बातमी लेखनाचे तंत्र’ या विषयाच्या अनुषंगाने पीपीटीद्वारे मार्गदर्शन करून बातमी लेखनाने पत्रकारितेचे कौशल्य आत्मसात होत असल्याचे नमूद केले. तसेच बातमी लेखनाच्या तंत्राबाबत अनेक टीप्स दिल्या. या सत्राचे सूत्रसंचालन रोहित देशमुख यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, मंगेश बाविसाने, प्रल्हाद लोहार, भिकन बनसोडे, शेखर पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content