नवी दिल्ली, वृत्तसंस्था | ‘चांद्रयान-२’च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) देशवासियांचे आभार मानले आहेत. “आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही जगभरातील भारतीयांच्या आशा आणि त्यांच्या स्वप्नांपासून प्रेरित होऊन पुढे जात राहू,” असे ट्विट इस्रोने केले आहे.
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या ‘सॉफ्ट लँडिंग’चे प्रयत्न सुरू असताना त्याचा संपर्क तुटला. इस्रोच्या प्रयत्नांचे देश आणि जगभरातून कौतुक करण्यात आले. विक्रम लँडरचा संपर्क तुटला, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या नियंत्रण कक्षात होते. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला होता. आपल्या ४७ दिवसांच्या प्रवासात ‘चांद्रयान-२’ने अनेक अडथळे पार केले होते आणि विक्रम लँडरच्या माध्यमातून रोवर प्रज्ञानला अखेरच्या क्षणी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवायचे होते. मात्र, अनियंत्रित वेगामुळे हार्ड लँडिंग झाले. ‘चांद्रयान-२’ च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरची काही छायाचित्रेही पाठवली होती. त्यानंतर इस्रोने विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळू शकले नाही.