पाचोरा प्रतिनिधी । येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, याकरिता विविध बाह्य स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांचे दालन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्यात विद्यार्थी नेत्रदिपक अशी कामगिरी करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. अशाच प्रकारे शाळेतील ईश्वरी सुनिल पाटील इयत्ता ७ वी मधील विद्यार्थिनी सिल्व्हर झोन फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल ऑलम्पियाड ऑफ सायन्समध्ये देशात प्रथम आली आहे.
तिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले आहे. सिल्व्हर झोन फाऊंडेशन आयोजित इंटरनॅशनल ऑलम्पियाड ऑफ सायन्स या परीक्षेत तिने १०० पैकी १०० गुण मिळविले आहेत. तिची झोनल व ऑलिम्पियाड रँक १ आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासोबतच सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन द्वारा आयोजित इंटरनॅशनल इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये तिने ६० पैकी ५९ गुण मिळविले आहेत. तिने द्वितीय इंटरनॅशनल रँक मिळवून देदिप्यमान अशी कामगिरी केली आहे. या उत्तुंग यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे व प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी तिचे व तिला मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.